संघ विचाराच्या कुलगुरूंना पदावरून हटवा: आशिष देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 02:34 PM2020-01-09T14:34:28+5:302020-01-09T14:34:34+5:30
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक विद्यापीठांमध्ये कुलगुरु, प्र-कुलगुरु आणि निबंधक या पदांवर संघाच्या विचाराच्या लोकांच्या नियुक्त्या केल्या असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.
मुंबई: दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) संघाच्या विचारांचे कुलगुरु असल्यानेच हिंसाचाराची घटना घडली. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती टाळायची असल्यास संघ विचारांच्या कुलगुरु आणि प्र कुलगरु यांच्या नियुक्त्या रद्द कराव्यात, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
'जेएनयूमध्ये जो निंदनीयप्रकार घडला त्यावेळी एबीव्हीपी आणि भाजपच्या गुंडांना नक्कीच तेथील विद्यापीठ प्रशासनाची मदत मिळाली असणार आहे. जेएनयूचे कुलकुरु जगदीश कुमार हे देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच असल्याचे देशमुख म्हणाले.
तर मागील पाच वर्षात गेल्यावेळीच्या सरकारमध्ये मुख्यंमत्री राहिलेले व विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक विद्यापीठांमध्ये कुलगुरु, प्र-कुलगुरु आणि निबंधक या पदांवर संघाच्या विचाराच्या लोकांच्या नियुक्त्या केल्या असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.
त्यामुळे जेएनयूमधील घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रात टाळायची असल्यास संघ विचारांच्या कुलगुरुंच्या नियुक्त्या रद्द केल्या पाहिजेत अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे. तर या संदर्भात आपण मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सुद्धा देशमुख म्हणाले.