ही तर 'अनैसर्गिक आघाडी'चा खुलासा करणारी मुलाखत, आशीष शेलारांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 10:45 AM2020-02-03T10:45:29+5:302020-02-03T10:49:36+5:30
सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपावर जोरदार टीका केली आहे.
मुंबई - आज सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर भाजपा नेते आशीष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे. ही तर अनैसर्गिक आघाडीचा खुलासा करणारी मुलाखत असल्याचा टोला आशीष शेलार यांनी लगावला आहे.
सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपावर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला भाजपा नेते आशीष शेलार यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे. ''महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनैसर्गिक आघाडीचा “खुलासा” करणारी मुलाखत दिली आहे. त्यांच्याकडून महाराष्ट्रातील जनतेला राज्याच्या विकासाचा रोडमॅप आणि जनतेला “दिलासा” देणारी अपेक्षित होती, अशा आशयाचे ट्विट शेलार यांनी केले आहे.
महाराष्ट्राच्या मा. मुख्यमंत्र्यांनी
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 3, 2020
अनैसर्गिक आघाडीचा “खुलासा” करणारी मुलाखत दिली. महाराष्ट्रातील जनतेला राज्याच्या विकासाचा रोडमॅप आणि जनतेला “दिलासा” देणारी अपेक्षित होती.
दरम्यान, सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमधून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यासह अनेक बाबींवपर गौप्यस्फोट केले आहेत. या मुलाखतीमध्ये सध्या महाराष्ट्राचं राजकारण घडलंय किंवा बिघडलंय. काहींचं बिघडलं, काहींचं घडलं. आपण समाधानी आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, ''मी घडवणारा आहे, बिघडवणारा नाही. ज्यांचं कुणाचं बिघडलंय असं वाटत असेल तर त्यांनी ते स्वतःहून बिघडवून घेतलंय. मी नाही बिघडवलं! बरं, जसं ठरलं होतं तसं घडलं असतं तर आज मी आपल्यासमोर मुख्यमंत्री म्हणून बसलो नसतो. मी नेहमीचा जसा आहे आणि पुढेही राहणार आहे, तसाच बसलो असतो.''
'...तर असं हिंदुत्व स्वीकारायला तयार नाही'; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
...तर मी मुख्यमंत्री झालोच नसतो, उद्धव ठाकरेंचे विधान
मागल्या दाराने नव्हे, छप्पर फाडूनच आलोय; उद्धव ठाकरेंचे विरोधकांना प्रत्युत्तर
म्हणे CAA लागू होऊ देणार नाही, अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का? ; शेलारांची वादग्रस्त टीका
उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत हिंदुत्वाच्या मुद्यावरून टीका करणाऱ्या भाजपावर हल्लाबोल केला आहे. 'आम्ही हिंदुत्वावर ठाम आहोत आणि राहणार. त्यात तडजोड नाही' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच 'हिंदुत्वाच्या मुद्दयावर आम्ही एकत्र आलोे. त्यात आमच्या हिंदुत्वात वचन देणं आणि वचन पाळणं याला अपार महत्त्व आहे. वचन जर मोडलं जात असेल तर असं हिंदुत्व मी स्वीकारायला तयार नाही' अशा शब्दांत भाजपावर निशाणा साधला आहे.