२ जागा गमावल्या, १ नवी जागा मिळवली आणि १ नवा मित्र जोडला; आशिष शेलारांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 06:16 PM2023-02-03T18:16:59+5:302023-02-03T18:17:30+5:30
सत्यजित तांबे यांनी कुठे जायचं हा त्यांचा निर्णय आहे. आम्ही कुठलीही ऑफर देणार नाही असं प्रदेशाध्यक्षांनी सांगितले. पण शेलारांनी वेगळेच मत मांडले.
मुंबई - विधान परिषदेच्या ५ जागांचे निकाल लागले असून या निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला. नागपूर शिक्षक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला. त्यात नाशिकमध्ये भाजपानं कुठलाही अधिकृत उमेदवार न देता सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर ते कुठल्या पक्षाला पाठिंबा देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
त्यात भाजपा नेते आशिष शेलार यांनी सत्यजित तांबे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत संकेत दिलेत का असा प्रश्न उभा राहतो. विधान परिषदेच्या निकालावर आशिष शेलार म्हणाले की, या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपानं २ जागा गमावल्या, १ नवीन जागा मिळवली तर एक नवा मित्र जोडला किंवा जोडला जाईल असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्यजित तांबे यांच्या निकालावरून भाष्य केले आहे. त्याचसोबत ज्या २ जागा गेल्या त्याचे चिंतन केले पाहिजे. प्रदेशाध्यक्ष त्याबद्दल निर्णय घेतील असं त्यांनी सांगितले.
भाजपा कुठलीही ऑफर देणार नाही
सत्यजित तांबे यांनी कुठे जायचं हा त्यांचा निर्णय आहे. आम्ही कुठलीही ऑफर देणार नाही. सत्यजित तांबे यांना जर भाजपात यायचं असं वाटेत असेल तर आम्ही त्यांना अडवणार नाही. सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याबाबत जो निर्णय झाला तो स्थानिक नेत्यांनी घेतला. आम्ही काही खेळी केली नाही आणि खेळी फसली नाही. या जागेवर आतापासून ५ वर्ष मेहनत घ्यावी लागेल, वेळेवर ३-४ महिन्यापूर्वी या निवडणुका लढण्यास तयार नसतो. राजेंद्र विखेंनी निवडणूक लढवावी असा आमचा आग्रह आला परंतु ते तयार नव्हते. त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा अशी भूमिका पक्षाने घेतली अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
सत्यजित तांबे यांची भूमिका गुलदस्त्यात
सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर ते कुठल्या पक्षाला पाठिंबा देणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. सत्यजित तांबे यांच्या वडिलांना काँग्रेसनं अधिकृत तिकीट देऊनही त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. त्याऐवजी सत्यजित तांबे यांनी अपक्ष फॉर्म भरला. त्यामुळे काँग्रेसनं तांबे पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. आता सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर ते भाजपात प्रवेश करतील का याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता येत्या ४ तारखेला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील असं सांगत त्यांनी भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.