"...त्यांचीच 'पनवती' त्यांच्याच घशात घाल, रे महाराज्या!", मोदींच्या दौऱ्याआधी आशिष शेलारांचे गाऱ्हाणे! 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 03:04 PM2023-12-04T15:04:04+5:302023-12-04T15:04:50+5:30

नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी भाजप नेते आशिष शेलार यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये आशिष शेलार यांनी गाऱ्हाणं घातले आहे.

ashish shelar on pm narendra modi on sindhudurg daura | "...त्यांचीच 'पनवती' त्यांच्याच घशात घाल, रे महाराज्या!", मोदींच्या दौऱ्याआधी आशिष शेलारांचे गाऱ्हाणे! 

"...त्यांचीच 'पनवती' त्यांच्याच घशात घाल, रे महाराज्या!", मोदींच्या दौऱ्याआधी आशिष शेलारांचे गाऱ्हाणे! 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्यावर आज नौदल दिन साजरा केला जात आहे. त्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सोहळ्यात सिंधुसागरावर नौदल आपली ताकद दाखवणार आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. दरम्यान, नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी भाजप नेते आशिष शेलार यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये आशिष शेलार यांनी गाऱ्हाणं घातले आहे. तसेच, त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे. 

आशिष शेलार यांचं ट्विट... जसंच्या तसं...
"मा. नरेंद्र मोदी हे सगळ्यात पयले पंतप्रधान आसत जे आपल्या मालवणाक भेट देत हत…
नायतर आजतागायत इतके पंतप्रधान झाले हयसर कोणी एकान सुद्धा इच्छा आपणांक भेटूची इच्छा सुद्धा दाखवल्यान नाय…
आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींका शिवाजी महारांजांच्या रणनिती आणि आरमाराचा कौतुक म्हणान त्यांनी भारतीय नौदलाच्या नवीन झेंड्याचा डिझाईन महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेऊन तयार केल्यानी असा. आपल्या भारताच्या नौसेनेच्या एका लढाऊ बोटीक “मालवण” असा नाव दिल्यानी असा ..

आपल्या मालवानातल्या छ. शिवाजी महाराज्याच्या राजकोट किल्ल्यात भव्य अश्या पुतळ्याचा अनावरण होतला हा म्हणजे देशात पयल्यांदा आरमार उभारुची दूरदृष्टी असलेल्या आपल्या राजाक दिलेली ही मानवंदनाच असा.
बडबड करतलो तो राऊतांचो झिल… पत्रकार पोपटलाल… आता पंतप्रधानांचे आभार मानायचे सोडून कायतरी खुसपाट काढून वडाची साल पिंपळाक लावतले. बाकी ह्यांका काम काय हा दुसरा? धाक नाय दारारो, फुकटचो नगारो!

म्हणान आज गाऱ्हांना घालूनच टाकूया आणि ही काय ती इडा पिडा मागे लागली हा ती पळवून लावया!
हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहरांच्या देवा ….होय म्हाराज्या.. आई भराडी आणि रवळनाथा महाराज्या ..
उबाठा वडाची साल पिंपळाक लावतत… तोंडाक येता ता बोलत सुटले आसत, त्यांका वाईच अक्कल दी रे महाराज्या… इंडिया आघाडी करून जनतेक लुटुचो डाव करतत त्यांका सगळ्यांचा तुझो हिसको दाखव रे महाराज्या… जनसेवक पंतप्रधानांचो अपमान करतत.. त्यांचा काय ता बघून घे रे महाराज्या! त्यांचीच “पनवती” त्यांच्याच घशात घाल.. रे महाराज्या..!

◆मा. नरेंद्र मोदी हे सगळ्यात पयले पंतप्रधान आसत जे आपल्या मालवणाक भेट देत हत…

◆नायतर आजतागायत इतके पंतप्रधान झाले हयसर कोणी एकान सुद्धा इच्छा आपणांक भेटूची इच्छा सुद्धा दाखवल्यान नाय…

◆ आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींका शिवाजी महारांजांच्या रणनिती आणि आरमाराचा कौतुक… "

सिंधुदुर्ग किल्ल्यावर नौदल दिन साजरा होतोय
इतिहासात पहिल्यांदाच सिंधुदुर्ग किल्ल्यावर नौदल दिन साजरा केला जात आहे. यापूर्वी नौदल दिन मुंबईत साजरा केला जात. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास असलेल्या सागरी दुर्गावर यंदाचा नौदल दिन साजरा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि रणनिती अभ्यास नौदलासाठी प्रेरक ठरेल. तसेच, या सोहळ्याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना मानवंदना देण्याचा प्रयत्नही नौदलाकडून होत आहे. त्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सिंधुदुर्ग किल्ल्यावर येणार आहेत. तारकर्ली एमटीडीसीजवळ प्रमुख कार्यक्रम होणार असून नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार हे पंतप्रधानांचं स्वागत करतील. 

मोदींच्या ताफ्याची रंगीत तालीम
सिंधुदुर्ग किल्ल्याकडे पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा ज्या मार्गावरून जाणार आहे, त्या मार्गावर शनिवारी प्रशासनाच्या वतीने रंगीत तालीम घेण्यात आली. सागरी महामार्ग, कोळंब पूल, बोर्डिंग मैदान, फोवकांडा पिंपळ, राजकोट, भरड, एसटीस्टॅण्ड, वायरी, तारकर्ली या मार्गावर दुपारी चार ते सहा या वेळात पोलिसांनी गाड्यांचा ताफा नेऊन रंगीत तालीम घेतली. यावेळी रस्त्याच्या बाजूने नागरिकांनी उभे राहून पोलिसांच्या रंगीत तालीमचा आनंद घेतला.

Web Title: ashish shelar on pm narendra modi on sindhudurg daura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.