"गंगेत स्नान करुन पाप धुतलं जात नाही"; ठाकरेंच्या विधानावर आशिष शेलार म्हणाले, "औरंगजेबाचा जप ज्यांच्या..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 10:56 IST2025-02-28T10:37:45+5:302025-02-28T10:56:18+5:30
गंगेत स्नान केल्याने पाप धुतले जात नाही म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना आशिष शेलार यांचे प्रत्युत्तर

"गंगेत स्नान करुन पाप धुतलं जात नाही"; ठाकरेंच्या विधानावर आशिष शेलार म्हणाले, "औरंगजेबाचा जप ज्यांच्या..."
Ashish Shelar on Uddhav Thackeray: हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. नुकत्याच पार पडलेल्या महाकुंभावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. काही लोक स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यास घाबरतात, असं एकनाथ शिदेंनी म्हटलं. याला प्रत्युत्तर देताना गंगेत स्नान केल्याने कोणतेही पाप धुतले जात नाही म्हणत उद्धव ठाकरेंनीएकनाथ शिंदेंनी पलटवार केला. यावरुनच आता मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांसह महाकुंभात स्नान केले. मात्र उद्धव ठाकरे हे महाकुंभात गेले नाहीत. यावरुन एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. यावरुन उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्राशी गद्दारी करून केलेले पाप अनेकवेळा गंगेत स्नान करूनही धुतले जाणार नाही. मी गंगेचा आदर करतो, पण त्यात डुबकी मारून काय उपयोग? गंगेत उडी मारून देशद्रोही हे लेबल हटत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरेंच्या या टीकेवर मंत्री आशिष शेलार यांनी महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी म्हणत पलटवार केला.
"अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर उभे राहिले महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर कोट्यवधी श्रध्दाळू दर्शन करुन आले. आमच्या छत्रपती संभाजी महाराजांवरील "छावा" सिनेमा आला. महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यवधी लोकांनी तो पाहिला...! "छावा" वर महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी आणि त्यांचा "सामना" सोडून जगभरातील लिहिणारे, बोलणारे बोलत आहेत.. स्वागत करीत आहेत.कुंभमेळा भरला.. महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यवधी भाविक सहभागी होऊन पवित्र स्नान करुन आले. सभेत दाखवण्यापुर्ती हातात रुद्राक्षाची माळ घाली औरंगजेबाचा जप ज्यांच्या सदैव तोंडी... ओळखलेत का? महाराष्ट्रातील ते हिंदुत्ववादी ढोंगी?", अशी टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे.
भाजपवर टीका
"भाजपने प्रभू रामाचे महत्व सांगण्याची गरज नाही. स्वातंत्र्यलढ्यात ज्यांचे योगदान नव्हते त्यांच्या हातात सत्तेचा लगाम आहे, तर महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांचे योगदान नव्हते ते इथे सत्तेत आहेत," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.