"बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 02:43 PM2024-10-09T14:43:45+5:302024-10-09T14:44:19+5:30
Ashish Shelar slams Uddhav Thackeray Aaditya Thackeray: मविआकडून आगामी निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यावरून मतभेद असल्याचे बोलले जात आहे.
Ashish Shelar slams Uddhav Thackeray Aaditya Thackeray: महाराष्ट्रात २०१९च्या विधानसभा निवडणुकांच्या नंतर वेगळा राजकीय प्रयोग झाला. काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेशी महाविकास आघाडी केली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. अडीच वर्षांनी शिवसेनेत फूट पडल्याने मविआ सरकार कोसळले आणि ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेले. आता २०२४च्या विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना, मविआकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कोण असतील यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. ठाकरे गटाकडून सातत्याने उद्धव ठाकरेंचे नाव पुढे केले जात आहे. पण काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मात्र याबाबत निवडणुकीच्या निकालाची वाट पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या साऱ्या घटनांच्या नंतर भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे पिता-पुत्र उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली.
आशिष शेलार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ठाकरे पिता-पुत्रांवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी 'महाठगांचे गौरव गीत' या नावाची एक कविता पोस्ट केली असून त्यातून त्यांची खिल्ली उडवली आहे. "बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करून मुख्यमंत्रीपद मागतात! आगे जाव.. आगे जाव.. आज नही कल; "जाणते जण" तर म्हणतात, चल हट निघ चल! कटोरा घेऊन दोघे भाषणबाजी करतात, उगाच मोदी-शहांना ठग म्हणून लक्ष लोकांचे वेधतात! कटकमिशन ज्यांनी कोविडमधे बॉडी बॅगचे खाल्ले, महाठग तर महाराष्ट्राचे हेच होते ना ठरले?" अशा शब्दांत आशिष शेलारांनी ठाकरे गटावर टीका केली.
महाठगांचे गौरव गीत !!
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 9, 2024
बाप - बेटे हल्ली दारोदारी फिरतात
दारावर टक-टक करुन मुख्यमंत्रीपद मागतात
आगे जाव.. आगे जाव..आज नही कल
"जाणते जण" तर म्हणतात, चल हट निघ चल
कटोरा घेऊन दोघे भाषणबाजी करतात
उगाच मोदी- शहांना ठग म्हणून लक्ष लोकांचे वेधतात
कटकमिशन ज्यांनी कोविडमधे बॉडी बॅगचे…
लोकसभा निवडणुकीनंतर साऱ्यांनाच विधानसभा निवडणुकीचे वेध लागले होते. मधल्या वेळेत महाविकास आघाडीकडून बैठकांचे सत्र सुरुच होते. दोन महिन्यांपूर्वी ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे दिल्लीत गेले होते. तेथे ते काही दिवस वास्तव्यास होते. त्यावरून भाजपा आणि महायुतीने त्यांच्यावर टीका केली होती. ठाकरे दिल्लीत गांधी परिवाराशी भेट घेऊन मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची विनंती करायला गेल्याचे भाजपाने म्हटले होते. तसेच शरद पवारांशी सातत्याने झालेल्या बैठकीतही ठाकरे गटाने मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याबाबतच जोर दिल्याचा दावा महायुतीने केला होता. त्यावरून अनेकदा महायुतीकडून ठाकरेंना लक्ष्य केले आहे.