माझ्या उमेदवारीचा निर्णय काँग्रेस घेईल; तावडेंनी स्व:ताच्या पक्षाकडे लक्ष द्यावे: अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 01:09 PM2019-09-25T13:09:53+5:302019-09-25T14:02:03+5:30
विधानसभा निवडणुका जाहीर होताच राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.
मुंबई - माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आगामी विधानसभा निवडणुक लढवू नये असा उपरोधिक सल्ला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी चव्हाण यांना दिला होता. तर यावरूनच अशोक चव्हाण यांनी तावडे यांना उत्तर दिले आहे. तावडे यांनी फुकटचे सल्ले देऊ नयेत अशी टीका चव्हाण यांनी केली आहे. तर त्यांनी आपल्या पक्षातील बंडखोरीकडे लक्ष द्यावे असा प्रतीसल्ला सुद्धा चव्हाण यांनी तावडे यांना दिला.
विधानसभा निवडणुका जाहीर होताच राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करण्याचा कोणतेही संधी सोडत नाहीत. तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका करतांना त्यांनी विधानसभा निवडणूक लढू नयेत असे म्हणाले होते. लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता त्याची पुन्हा पुनरावृत्ती होणार असून,चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवू नयेत असे तावडे म्हणाले होते.
विनोद तावडेंनी त्यांच्या पक्षातील नेत्यांना सल्ले द्यावेत. मला फुकटचा सल्ला देऊ नये. मी निवडणूक लढवावी किंवा नाही हे माझा पक्ष ठरवेल असा टोला चव्हाण यांनी तावडेंना लगावला आहे.
मी निवडणूक लढवावी की नाही, हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याबाबत विनोद तावडेंच्या फुकटच्या सल्ल्याची गरज नाही.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) September 24, 2019
भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे ढोल बडवतो. पण माझ्याविरोधात त्यांना निष्ठावंत मिळत नाही आणि उमेदवार आयात करावा लागतो, याची तावडेंनी अधिक काळजी केली पाहिजे. pic.twitter.com/sasl7xRt5h
पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, भाजपने त्यांच्या पक्षातील निष्ठावंत नेत्यांना डावलून बाहेरून आयात केलेल्या लोकांना माझ्या विरोधात उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जात असून, याचा त्यांनी आत्मपरीक्षण करयला पाहिजे. असा सल्ला सुद्धा चव्हाण यांनी भाजपला दिला.