आमचं सरकार एनआरसी कायदा लागू होऊ देणार नाही : अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 02:00 PM2020-01-20T14:00:13+5:302020-01-20T14:15:44+5:30
चव्हाण यांनी नागरिकत्व कायद्याला विरोध करत भाजपवर निशाणा साधला.
मुंबई : देशभरात नागरिकत्व कायद्याला विरोध केला जात असून अनेक राज्यांनी या कायद्याची अमलबजावणी करणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यातच आता महाराष्ट्रात सुद्धा एनआरसी कायदा लागू होऊ देणार नसल्याचे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. नांदेड येथील सीएए, एनआरसी, एनपीआरच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी आले असता ते बोलत होते.
यावेळी चव्हाण यांनी नागरिकत्व कायद्याला विरोध करत भाजपवर निशाणा साधला. देशातील प्रत्येक नागरिकाला या देशात राहण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार अधिकार आहे. मात्र भाजपकडून जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करून अल्पसंख्यांकामध्ये भीतीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला..
विधानसभा अधिवेशनात सर्वप्रथम मी सीएए कायद्याच्या विरोधात भूमिका घेतली. तसेच महाराष्ट्रात नागरिकत्व कायदा लागू करू नयेत यावर चर्चा झाली पाहिजे अशी भूमिका मांडली असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले. तर राज्यात महाविकास आघाडीच सरकार असून आमचं सरकार एनआरसी कायदा लागू होऊ देणार नसल्याचे सुद्धा यावेळी चव्हाण म्हणाले.