मोदी सरकारची दोन वर्षे अपेक्षाभंगाची आणि फसवणुकीची- अशोक चव्हाण
By admin | Published: May 25, 2016 09:11 PM2016-05-25T21:11:13+5:302016-05-25T21:11:13+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वारेमाप घोषणाबाजी केली.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वारेमाप घोषणाबाजी केली. जनतेला अच्छे दिनची स्वप्ने दाखवली. पण दोन वर्षात या सरकारने घोर निराशा केली असून, जनतेच्या मनात फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे, अशी सडकून टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज केली.
मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कारभाराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना अशोक चव्हाण म्हणाले की, अब की बार मोदी सरकारचा नारा देत भाजप सत्तेत आली. पण जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना त्याकडे लक्ष देण्यास मोदींना वेळ नाही. पंतप्रधान मराठवाड्याला साधी भेटही देऊ शकलेले नाहीत. 2015 या एका वर्षात महाराष्ट्रात 3228 शेतक-यांनी आत्महत्या केल्या. पण त्याची दखलही या सरकारने घेतलेली दिसत नाही. शेतक-यांना कर्जमाफी देणे तर दूरच राहिले पण त्यांना योग्य ती आर्थिक मदत देण्यातही सरकारने हात आखडता घेतला.
शेतकरी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक अशा कोणत्याही घटकाला मोदी सरकार न्याय देऊ शकले नाही. लव्ह जिहाद, घरवापसी, बीफ बॅन, भारत माता की जय, असे मुद्दे जाणीवपूर्वक पुढे करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम या सरकारने दोन वर्षात केले, असा आरोपही त्यांनी केला.
महागाई कमी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. पण दोन वर्षात महागाई कमी तर झाली नाहीच पण सामान्य लोकांचे जगणे मात्र महाग झाले, असे टीकास्त्र अशोक चव्हाण यांनी सोडले. 77 रुपये किलोने मिळणारी तूर दाळ 200 रुपये किलो झाली, पेट्रोल-डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात कमालीचे घसरले पण भारतात मात्र हे दर त्याप्रमाणात कमी झाले नाहीत. काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासनही हवेतच विरले आहे. अजूनही लोक 15 लाख रुपये आपल्या खात्यात कधी जमा होतात, याची वाट पाहत असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.
मोदी सरकार सर्वसामान्य जनता, शेतकरी, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजाच्या हिताचे नसून ते फक्त मूठभर धनदांडग्यांचे सरकार असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. मोदी सत्तेत आल्यानंतर देशातील सर्व घटकांचे अच्छे दिन संपल्याचे दिसत आहे. लोकांची फसवणूक करणाऱ्या या सरकारचा प्रतिकात्मक निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्ष 26 ते 31 मे दरम्यान आंदोलन करणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे.