प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण !

By admin | Published: March 3, 2015 03:01 AM2015-03-03T03:01:22+5:302015-03-03T03:01:22+5:30

पक्षाच्या पराभवानंतर काँग्रेसने राज्य नेतृत्वात फेरबदल करीत माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

Ashok Chavan is the state president! | प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण !

प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण !

Next

काँग्रेसमध्ये फेरबदल : संजय निरुपम मुंबईचे प्रमुख
मुंबई : लोकसभा आणि त्यापाठोपाठ झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर काँग्रेसने राज्य नेतृत्वात फेरबदल करीत माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तर मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे माजी खासदार संजय निरुपम यांच्याकडे सोपविली आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी याबाबत घोषणा केली.
उद्योगमंत्री, महसूलमंत्री, मुख्यमंत्री अशी यशस्वी कारकीर्द खात्यावर जमा असलेल्या खा. चव्हाणांची नियुक्ती ही पक्षापुढील आव्हाने पेलण्यासाठी सक्षम नेता या निकषातून झाली. उत्तम संघटक अशी ख्याती असलेले खा. चव्हाण पक्षाची पुनर्बांधणी करून कार्यकर्त्यांनी गमावलेला आत्मविश्वास परत मिळवून देतील, या अपेक्षेनेच पक्षनेतृत्वाने त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वत्र काँग्रेसची पडझड होत असताना अशोकरावांनी स्वत:च्या नांदेड मतदारसंघासह शेजारच्या हिंगोलीचा गड कायम राखला. कार्यकर्त्यांशी थेट संपर्क, प्रशासकीय आणि संघटन कौशल्य, मराठीसह हिंदी आणि इंग्रजीवर प्रभुत्व ही त्यांची गुणवैशिष्ट्ये आहेत. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यानंतर खूप वर्षांनी मराठवाड्याकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यपक्ष आले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेदेखील याच प्रदेशातील असल्याने उभयतांची राजकीय जुगलबंदी यापुढे पाहायला मिळेल.
अशोक चव्हाण यांची निवडी काँग्रेसला बळकटी देईल, असा विश्वास विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला निश्चितच होईल. त्यामुळे राज्यातील पक्षसंघटना मजबूत होईल. (विशेष प्रतिनिधी)

माणिकपर्व संपले!
सर्वाधिक काळ प्रदेशाध्यक्षपदी राहिलेले माणिकराव ठाकरे यांची कारकिर्द अखेर संपुष्टात आली. २००८ साली ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सतत पक्षाला अपयश आले. २०१४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस पक्षाचे पानिपत झाले.

सरकारवर ठेवू अंकुश
पक्षासमोरील आव्हानांना सामोरे जातानाच राज्यात सकारात्मक विरोधकाची भूमिका पार पाडण्यावर आपला भर असणार आहे. केवळ विरोधाला विरोध ही काँग्रेसची भूमिका नाही, तर सरकारवर अंकुश लावण्याचे काम करणार.
-अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

राहुल गांधींच्या वाढत्या प्रभावानेच फेरबदल
च्लोकसभा आणि त्यापाठोपाठच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसने पाच राज्यांमध्ये संघटनात्मक नेतृत्वात केलेले फेरबदल हे पक्षाचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या संभाव्य अधिकारवाढीचे सूचक लक्षण मानले जात आहे.
च्राहुल यांना या सर्व ठिकाणी नवे प्रदेशाध्यक्ष हवे होते. ही अ.भा. काँग्रेस कार्यकारिणीतील बदलाची नांदी मानली जात आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणीच्या अधिवेशनात पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची धुरा सोपविली जाण्याची शक्यता आहे.

नवे प्रदेशाध्यक्ष
दिल्ली : अजय माकन,
महाराष्ट्र : अशोक चव्हाण
जम्मू-काश्मीर :
गुलाम अहमद मीर,
गुजरात : भरतसिंग सोळंकी
तेलंगणा : उत्तम रेड्डी

नाराज राणेंची पक्षावर टीका ! : प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी झालेल्या अनुक्रमे अशोक चव्हाण आणि संजय निरुपण यांच्या निवडीवर आक्षेप घेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. कार्य, कर्तृत्व आणि कामगिरी या बळावर काँग्रेसमध्ये नियुक्ती केली जात नाही, अशी थेट टीका करीत त्यांनी मुंबईत मराठी भाषिक नेत्याची निवड व्हायला हवी होती, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Web Title: Ashok Chavan is the state president!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.