विकासाच्या मुद्द्याला नांदेडच्या जनतेचा पाठिंबा, खालच्या पातळीवरील प्रचाराला चपराक- अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 01:37 PM2017-10-12T13:37:33+5:302017-10-12T13:39:21+5:30
नांदेडच्या जनतेने विकासाच्या मुद्द्याला पाठिंबा दिला असून नांदेडमध्ये खालच्या पातळीवर प्रचार करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
मुंबई- नांदेडच्या जनतेने विकासाच्या मुद्द्याला पाठिंबा दिला असून नांदेडमध्ये खालच्या पातळीवर प्रचार करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना गड राखण्यात यश आलं आहे. नांदेडमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण यांनी नांदेडकरांचे आभार मानले आहेत तसंच भाजपावर सडेतोड टीकाही केली आहे. नांदेडच्या जनतेने विकासाच्या मुद्द्याला पाठिंबा दिल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हंटलं आहे.
लोकांचा माझ्यावर आणि माझ्या पक्षावर पूर्ण विश्वास आहे. त्याचीच पोचपावती नांदेडकरांनी दिल्याचं अशोक चव्हाण म्हणाले आहेत. भाजपाने नांदेडमध्ये बाहेरची माणसं आणून प्रचार केला तसंच आमच्या कामावर प्रश्न निर्माण केले पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही, पण उलट त्याचा फटका भाजपाला बसल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हंटलं आहे. लोकांचा काँग्रेसवर विकासात्मक दृष्टीने विश्वास आहे तो विश्वास काँग्रेस पूर्ण करेल, असंही अशोक चव्हाण यांनी म्हंटलं. मला व्यक्तिगत कुणावरही काही बोलायचं नाही, जनतेने विश्वासापोटी सत्ता हाती दिली, असं मत अशोक चव्हाण यांनी मांडलं आहे. नांदेडमध्ये काँग्रेसचा जो विजय झाला त्यामध्ये लोकांचा हातभार असून काँग्रेस पक्षावर निष्ठा असणाऱ्यांचा विजयामध्ये सहभाग असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यावेळी शिवसेनेवरही टीका केली आहे. शिवसेना फक्त बोलते पण त्याच्या बोलण्यात दम असल्याचं ते म्हणाले आहेत. शिवसेनेचा त्यांच्या लोकांवर अंकुश नाही, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर टीका केली.