अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदेंच्या उमेदवारी अर्जावरील आक्षेप फेटाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 05:37 AM2019-03-28T05:37:48+5:302019-03-28T06:45:54+5:30
नांदेड लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण आणि सोलापूर मतदार संघातील सुशीलकुमार शिंदे या दोन मातब्बरांच्या अर्जावर अपक्ष उमेदवारांनी घेतलेले आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले.
सोलापूर/ नांदेड : नांदेड लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण आणि सोलापूर मतदार संघातील सुशीलकुमार शिंदे या दोन मातब्बरांच्या अर्जावर अपक्ष उमेदवारांनी घेतलेले आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले. चव्हाण यांच्या अर्जावरील निर्णय अधिकाऱ्यांनी रात्री पावणेअकरा वाजता दिला व काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला.
शिंदे यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या आणि प्रीतम मुंडे यांच्या अर्जावरील आक्षेप फेटाळण्यात आले. २०१४ च्या निवडणुकीत चव्हाण हे उमेदवार होते. त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करताना पत्नी, मुली यांना कोट्यवधींचे कर्ज दिल्याचे नमुद केले होते. तसेच काही मालमत्तांची माहितीही दिली होती, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र कुटुंबियांशी केलेल्या व्यवहाराची कोणतीही माहिती प्रतिज्ञा पत्रात दिली नाही. तसेच काही मालमत्तांबाबतची माहितीही त्यांनी दडविल्याचा आरोप अपक्ष उमेदवार रवींद्र गणपत थोरात आणि बहुजन महापार्टीचे शेख अफजलोद्दीन अजिमोद्दीन यांनी केला होता.
उज्वल गॅस एजन्सीच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजनांतील अनुदानाचा थेट लाभ चव्हाण घेत असल्याचेही आक्षेपकर्त्यांचे म्हणणे होते. हे सर्व आक्षेप जिल्हा निवडणूक अधिकारी डोंगरे यांनी फेटाळून लावले.
सुशीलकुमार यांचे खरे नाव दगडू शंभू शिंदे हे आहे, पण उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी सुशीलकुमार संभाजीराव शिंदे असा उल्लेख केलेला आहे, असा आक्षेप अपक्ष प्रमोद गायकवाड यांनी घेतला होता; मात्र शिंदे यांनी नावातील बदलाबाबतचे गॅझेट अर्जासोबत जोडल्याचे सांगत निवडणूक अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळून लावला.
तसेच, शिंदे यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला व नावाबाबतही गायकवाड यांनी आक्षेप घेतला होता. जयसिद्धेश्वर यांचे मूळ नाव नूरंदय्या गुरूबसप्पा हिरेमठ असे आहे. तसेच ते बेडा जंगम नसून हिंदू लिंगायत आहेत, असा दावा करीत गायकवाड यांनी पुराव्यादाखल शाळा सोडल्याचा दाखला सादर केला. त्यावर शिवाचार्य यांचे वकील संतोष न्हावकर यांनी नावातील बदल केलेले पुरावे व जातपडताळणीचे दाखले सादर केले. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी आक्षेप फेटाळून लावला.
- प्रीतम मुंडे यांच्या अर्जावर
आक्षेप घेणारे काँग्रेसचे कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मारहाण झाली. तश्ी तक्रार त्यांनी पोलिसात दिली आहे. अपक्ष उमेदवार कालिदास आपेट यांनीही प्रीतम यांच्या अर्जावर काही आक्षेप घेतले, मात्र निवडणूक निर्णय अधिकाºयांनी ते फेटाळून लावले.