राज्यसभेत वर्णी; अशोक चव्हाण म्हणाले की, “माझे येणे अन् नारायण राणेंचे जाणे हे...”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 04:22 PM2024-02-16T16:22:49+5:302024-02-16T16:23:00+5:30
Ashok Chavan On Narayan Rane: राज्यसभेसाठी नारायण राणे यांच्या नावाची चर्चा होती. पण अशोक चव्हाण भाजपात आले आणि राज्यसभेची उमेदवारी मिळाली, असे सांगितले जात आहे.
Ashok Chavan On Narayan Rane: अलीकडेच काँग्रेस पक्षाला रामराम करत ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपा प्रवेश केला. भाजपा प्रवेशानंतर दुसऱ्याच दिवशी अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. भाजपाकडून नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी मिळू शकते, असे कयास बांधले जात होते. मात्र, अशोक चव्हाण यांची वर्णी लागली. याबाबत अशोक चव्हाण यांनी भाष्य केले आहे.
अशोक चव्हाण यांनी १२ फेब्रुवारीला काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. तर १३ फेब्रुवारीला त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाने १४ फेब्रुवारी रोजी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आणि १५ फेब्रुवारीला त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपाने महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, डॉ. अजित गोपछडे आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवायचा निर्णय घेतला आहे. भाजपाने नारायण राणेंऐवजी अशोक चव्हाणांची निवड का केली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.
भाजपा प्रवेशानंतर नारायण राणे यांनी फोन केला होता
आमचे स्टार्स कुठेतरी मिसमॅच होत आहेत. हे असे का होत आहे, ते मला माहिती नाही. भाजपात प्रवेश केल्यानंतर नारायण राणे यांनी फोन केला होता. खूप दिवसांनी फोन केला होता. पक्षात आल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. परंतु, राज्यसभा उमेदवारीबद्दल काही सांगता येणार नाही. कारण तेव्हा मी भाजपात नव्हतो. माझे येणे आणि नारायण राणे यांचे जाणे याचा काही संबंध नाही. पक्ष नेतृत्वाने असा निर्णय का घेतला हे मला माहिती नाही. माझ्या उमेदवारीबद्दल ठरले होते असे म्हणणार नाही. परंतु त्यांना जरुर वाटले असेल की माझ्यासारखा अनुभवी नेता, ज्याने प्रशासनात काम केलं आहे, ज्याने राजकीय क्षेत्रात काम केले आहे, त्याचा दिल्लीत अधिक उपयोग होऊ शकतो, असे त्यांना कदाचित वाटले असेल. त्यामुळे तातडीने त्यांनी निर्णय घेऊन संधी दिली. हा त्यांचा मोठेपणा आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी नारायण राणे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. अचानक अशोक चव्हाण यांचे नाव पुढे आले. ते मुख्यमंत्री झाले. आता पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे. नारायण राणे यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत होते. अशोक चव्हाण भाजपात आले आणि त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली, असे सांगितले जात आहे.