आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर !

By Admin | Published: November 7, 2016 11:10 PM2016-11-07T23:10:33+5:302016-11-07T23:10:33+5:30

पाळा येथील आदिवासी आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात आली असून या शाळेमधील ३८८ विद्यार्थ्यांचे अद्याप दुसऱ्या शाळेमध्ये समायोजन करण्यात आलेले नाही.

Ashramshala students' education question on the anecdote! | आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर !

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर !

googlenewsNext

गणेश मापारी/ऑनलाइन लोकमत 
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 7 - पाळा येथील आदिवासी आश्रम शाळेची मान्यता रद्द करण्यात आली असून या शाळेमधील ३८८ विद्यार्थ्यांचे अद्याप दुसऱ्या शाळेमध्ये समायोजन करण्यात आलेले नाही. दिवाळीच्या सुट्यानंतर बुधवारी शाळा सुरु होणार असल्याने यासर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
खामगाव तालुक्यातील पाळा येथील आदिवासी निवासी आश्रम शाळेमध्ये दोन अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात १७ जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात दोषी असलेल्या आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अशा ८ जणांविरुध्द निलंबनाची कारवाई करण्यात आली असून सोमवारी देखील आणखी दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. दोषींना निलंबित करण्यासोबत या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध आदिवासी शाळांमध्ये त्वरित समायोजन करण्यात येईल, अशी माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिली. तथापी दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचाच अवधी शिल्लक असताना अद्याप विद्यार्थ्यांचे समायोजन कोणत्याही शाळेत करण्यात आलेले नाही. पाळा येथील आश्रम शाळेची मान्यता रद्द असल्याने ही शाळा उघडणारच नसून पुढील शिक्षणासाठी दुसरी शाळाही अद्याप निश्चीत झालेली नाही. त्यामुळे या शाळेतील सर्व ३८८ विद्यार्थ्यांसाठी बुधवारी शाळाच उघडणार नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.
आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मुळगावी वेगवेगळी पथके पाठविली असून विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार त्यांचे आदिवासी शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. या प्रक्रियेला बराच अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी शासनाने विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत त्वरित निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

आश्रमशाळेत पाच जिल्ह्यातील विद्यार्थी
पाळा येथील निवासी आदिवासी आश्रमशाळेत पाच जिल्ह्यांमधील विद्यार्थी शिकतात. बुलडाणा, वाशिम, अकोला, जळगाव आणि अमरावती या पाच जिल्ह्यांमधील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांना या आश्रम शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे पाचही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांशी भेटणे आणि विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळेत समायोजन करणे यासाठी आदिवासी विभागाच्या पथकाकडून प्रयत्न सुरु आहेत.
निवासी शाळेच्या नावाने पालकांमध्ये भीती
विद्यार्थिनींवर घडलेला अत्याचार हा निवासी आश्रम शाळेमध्ये झालेला आहे. त्यामुळे निवासी शाळेबाबत आता या शाळेमधील सर्व विद्यार्थिनींच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी मधील विद्यार्थी व विद्यार्थिनी पाळा येथील आश्रम शाळेत आहेत. त्यामुळे आता पाळा येथीलच नव्हे तर कोणत्याही निवासी आश्रम शाळेत विद्यार्थिनींनाच नव्हे विद्यार्थ्यांनाही पाठविणार नसल्याची भूमिका काही पालकांनी घेतल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.
दिवाळीची सुट्टी असल्याने सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित भेटणे शक्य नाही. त्यामुळे पाच जिल्ह्यांमध्ये आदिवासी विभागाचे पथक पाठविण्यात आले आहे. लवकरात लवकर विद्यार्थ्यांचे समायोजन दुसऱ्या आदिवासी शाळांमध्ये करण्यात येईल.
-व्ही.ए. सोनवणे, प्रकल्प अधिकारी आदिवासी प्रकल्प कार्या.अकोला

Web Title: Ashramshala students' education question on the anecdote!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.