अरबी समुद्रात ‘अशोबा’ चक्रीवादळ!
By admin | Published: June 9, 2015 03:48 AM2015-06-09T03:48:02+5:302015-06-09T03:48:02+5:30
अरबी समुद्रात खोल दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ‘अशोबा’ या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. येत्या २४ ते ३६ तासांत हे वादळ उग्र रूप धारण करू शकते.
मुंबई : अरबी समुद्रात खोल दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ‘अशोबा’ या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. येत्या २४ ते ३६ तासांत हे वादळ उग्र रूप धारण करू शकते. ‘सुपर सायक्लोन’मध्ये रूपांतरित होताना हे चक्रीवादळ उत्तर, वायव्य दिशेने सरकत ओमानच्या दिशेने जात असल्याने भारताला धोका कमीच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तथापि वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे समुद्र रौद्ररूप धारण करणार असून कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.मध्यपूर्व अरबी समुद्रात खोल दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर गेल्या सहा तासांत वायव्य दिशेने वाटचाल सुरू असताना त्याची तीव्रता वाढून ते सोमवारी सकाळी ८.३० वाजता मुंबईच्या पश्चिम- नैऋत्य दिशेला ४७० किमी अंतरावर वेरावल तसेच ओमानच्या मसिरा बेटावरील ९६० किमी अंतरावरील पूर्व-आग्नेयेकडे असल्याचे वृत्त आहे. पुढील ३६ तासांत त्याची तीव्रता आणखी वाढू शकते, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
या चक्रीवादळाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ पुढच्या काही तासांत उत्तर आणि वायव्य दिशांना सरकरण्याची शक्यता असून, मुख्यत: या चक्रीवादळाचा प्रवास ओमानच्या दिशेने होत आहे.
- शुभांगी भुते, संचालक, मुंबई प्रादेशिक
हवामान खाते
भारताला धोका कमीच
चक्रीवादळ भारतात धडकण्याची शक्यता कमीच आहे. आम्ही चक्रीवादळाच्या गतीवर लक्ष ठेवून आहोत. त्याची तीव्रता वाढल्यानंतरच ते कुठे सरकेल याचा अंदाज वर्तवता येईल, असे आयएमडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. चक्रीवादळ भारतीय किनाऱ्यापासून किंचित दूर सरकले असून त्याच्या प्रभावामुळे कर्नाटक, कोकण, गोवा आणि दक्षिण गुजरातमध्ये पुढील २४ तासांत पाऊस पडू शकतो, असे स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने स्पष्ट केले आहे.
वाऱ्याचा वेग वाढणार
कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग ताशी ७० ते ८० कि.मी. राहणार असून कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र किनारपट्टीमध्ये वारे चक्राकार फिरताना हा वेग ९० ते १०० किमीपर्यंत राहू शकतो. वाऱ्याच्या वेगामुळे कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात समुद्र रौद्ररूप धारण करू शकतो. महाराष्ट्रासह गुजरातच्या किनारपट्टीवर सोसायट्याचा वारा सुटेल व पुढील ४८ तासांत पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
मान्सून राज्यात दाखल
मृग नक्षत्राचा मुहूर्त साधत मान्सून सोमवारी महाराष्ट्रात दाखल झाल्याचे भारतीय हवामान शास्त्र विभागाने जाहीर केले आहे. पुढील ४८ तासांतच तो मुंबईत दाखल होईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.
मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खान्देशात रविवारी पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने सुखद दिलासा दिला होता. यादरम्यान वीज कोसळून राज्यात आठ जणांचा मृत्यू झाला होता.
मान्सूनपूर्व पावसाला चोवीस तास उलटत नाहीत तोवर मान्सून सोमवारी गोव्यासह महाराष्ट्रात दाखल झाला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नैऋत्य मौसमी पाऊस दक्षिण कोकणाच्या काही भागात आणि गोव्यात सोमवारी दाखल झाला आहे.
नैऋत्य मौसमी पावसाची उत्तरी सीमा आणखी उत्तरेकडे सरकली आहे. त्यानुसार, नैऋत्य मौसमी पाऊस मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, दक्षिण कोकणाच्या काही भागात, उर्वरित कर्नाटक व दक्षिण कर्नाटकच्या किनारपट्टीच्या काही भागात दाखल झाला आहे.
नैऋत्य मौसमी पाऊस पुढील ४८ तासांत मध्य अरबी समुद्र, कोकण व कर्नाटकच्या आणखी काही भागात, उर्वरित तामिळनाडू, रायलसीमा व
आंध्रप्रदेश किनारपट्टीच्या काही भागात, मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, असेही हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले.