अश्विनीच्या अकाली एक्झिटने चित्रपट, नाट्यविश्व सुन्न
By admin | Published: October 24, 2016 12:54 AM2016-10-24T00:54:34+5:302016-10-24T00:54:34+5:30
एक हरहुन्नरी कलावंत.. अभिनय, नृत्य, निवेदन अशा कलांमध्ये पारंगत असलेली एक प्रतिभावान अभिनेत्री... ज्या रंगभूमीसाठी तिने संपूर्ण आयुष्य वेचले
पुणे : एक हरहुन्नरी कलावंत.. अभिनय, नृत्य, निवेदन अशा कलांमध्ये पारंगत असलेली एक प्रतिभावान अभिनेत्री... ज्या रंगभूमीसाठी तिने संपूर्ण आयुष्य वेचले, तिची रंगमंचावर अकाली एक्झिट व्हावी, याचा धक्का नाट्य-चित्रपटसृष्टीला बसला. तिच्या जाण्याने सुन्न झालेल्या रंगकर्मींनी अत्यंत जड अंत:करणाने साश्रूनयनांनी तिला रविवारी निरोप दिला. तिचे जाणे सर्वांनाच अंतर्मुख करून गेले.
भरतनाट्य मंदिरात ‘नाट्यत्रिविधा’ कार्यक्रमाची भैरवीने सांगता करताना अश्विनीच्या आयुष्याची भैरवीही अशा पद्धतीने आळविली जाईल, हे कुणालाच स्वप्नातही वाटले नाही. रविवारी सकाळी तिचे पार्थिव भरतनाट्य मंदिर आणि टिळक स्मारक मंदिर येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
ज्येष्ठ रंगकर्मी विक्रम गोखले, शरद पोंक्षे, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, मुक्ता बर्वे, दिग्दर्शक विजय केंकरे, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले गिरीश परदेशी, श्याम देशपांडे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डॉ. गजानन एकबोटे, माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे, संगीतकार राहुल रानडे, नरेंद्र भिडे, संजय ठुबे, प्रसाद ओक, अशोक शिंदे, श्रृती मराठे, नाट्य परिषद कार्यवाह दीपक करंजीकर, हर्षदा खानविलकर,
ज्येष्ठ नाट्यसमीक्षक माधव वझे, माधव अभ्यंकर, विभावरी देशपांडे, प्रवीण तरडे आदींनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
विक्रम गोखले : अश्विनी एकबोटे ही हरहुन्नरी कलाकार होती, नृत्य, नाटक आणि सिनेमासाठी तिने स्वत:ला झोकून दिले होते. या वयात ती अशा पद्धतीने गेली, हे दु:खदायक आहे. अश्विनी आपल्यात नाही हे स्वीकारतानाही त्रास होतो आहे. पुन्हा जन्म घेऊन तिने अभिनय करावा ही प्रार्थना आहे. स्पर्धा कितीही असली तरी कलाकाराने आपल्या तब्येतीकडे मात्र लक्ष दिले पाहिजे.
माधव अभ्यंकर : एका झंझावाताचा अंत झाला. ‘चार्ली चॅप्लिन’ च्या मूकनाट्यात भूमिका करीत असल्यापासून मी अश्विनीचा प्रवास पाहिला आहे. ती उत्तम कलाकार होती. ‘सोनियाचा उंबरा’ मालिकेमध्ये ती माझी सून होती. तिच्या भूमिकेमुळे मालिकेतील माझी व्यक्तिरेखाही उजळून निघाली.
मेघराज राजेभासेले : अश्विनी एकबोटे यांचे मराठी चित्रपटसृष्टी आणि नृत्यक्षेत्रासाठी मोठे योगदान होते. या क्षेत्रासाठी त्यांची खूप काही करण्याची त्यांची स्वप्ने होती. त्यासाठी त्या कायम प्रयत्न करीत होत्या.
गिरीश परदेशी : कलेच्या क्षेत्रात स्पर्धा वाढत आहे, त्याचा परिणाम कलाकारांच्या मानसिकतेवर होतो. अश्विनी एकबोटे यांची कारकीर्द ज्याप्रमाणे विचार करायला लावणारी होती, तशी त्यांची एक्झिटही अंतर्मुख करायला लावणारी आहे.
योगेश सोमण : ती गेल्याचं मुंबईतून निघताना समजलं, म्हणजे ती बातमी आदळली. प्रवासभर इतरांबरोबर ती बातमी शेअर करताना मुंबई -पुणे प्रवास कधी सरला समजलंच नाही. घरी पोहोचलो. घरात एकटा उरलो असताना आदळलेल्या बातमीचा अन्वयार्थ लावू लागलो. तिला पहिल्यांदा पाहिलं ते नंदनवन नावाच्या नृत्यनाट्यात अभिनय करताना, नंतर सावल्या नावाच्या एकांकिकेत तेव्हा आपण स्पर्धक होतो, त्यानंतर अनेक मालिकांतून, नाटकांतून तिला घडताना मी बघत होतो. या सगळ्या कालखंडात ती तिची घडत होती. अपरंपार कष्ट करीत होती. गेल्या एक-दोन वर्षातील तिचा अभिनय आणि नृत्य दोन्ही अधिक परिपक्व होऊ लागल्याचं जाणवत होतं. हा तिचा प्रवास पूर्ण होण्याअगोदरच नियतीनं तो थांबवला, नियतीनं रडीचा डाव खेळलाय.