अश्विन नाईकची कोठडीत रवानगी
By admin | Published: December 22, 2015 02:14 AM2015-12-22T02:14:22+5:302015-12-22T02:14:22+5:30
व्यावसायिकाकडून खंडणी उकळताना रंगेहाथ अटक केलेल्या गँगस्टर अश्विन नाईकसह त्याच्या पाच साथीदारांची रवानगी २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
खंडणी प्रकरण : विनाकारण अडकविल्याचे नाईकचे म्हणणे
मुंबई : व्यावसायिकाकडून खंडणी उकळताना रंगेहाथ अटक केलेल्या गँगस्टर अश्विन नाईकसह त्याच्या पाच साथीदारांची रवानगी २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
दादर येथील बांधकाम व्यावसायिक संतोष पाटील यांच्याकडून खंडणी वसूल करताना अश्विन नाईकला रंगेहाथ अटक करण्यात आली. नाईकसह प्रमोद केळुसकर, जनार्दन सकपाळ, प्रथमेश परब, राजेश तांबे यांना सोमवारी भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने नाईकसह पाचही जणांना २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
शिवाजी पार्क येथील संतोष पाटील हे ओम ग्रुपसह भागीदारीत विकासक म्हणून काम करतात. पाटील यांच्या भागीदाराकडून नाईकने यापूर्वी २५ लाखांची खंडणी उकळली होती. त्यापाठोपाठ पाटीलकडेही नाईक टोळीने ५० लाखांच्या खंडणीची मागणी केली. या खंडणीतील आगाऊ रक्कम घेण्यासाठी २० नोव्हेंबर रोजी नाईक हा केळुसकर आणि इतर साथीदारांसह इनोव्हा कारने दादरच्या भवानी शंकर रोडवर आला होता. बराच वेळ नाईक परिसरात पोलीस आहेत का? याचा अंदाज घेत होता. ठरल्यानुसार, पाटील पैशांची बॅग घेऊन तेथे दाखल झाला. पैशांची बॅग नाईककडे सोपवताच दादर पोलिसांनी त्याला रंगेहाथ अटक केली. पोलिसांनीच पाटीलकडे दिलेल्या पैशांच्या बॅगेत केवळ २ लाखांच्या खऱ्या नोटा होत्या.
नाईक यांच्या टोळीने यापूर्वी पाटील यांच्या भागीदाराकडून वसूल केलेल्या २५ लाखांसह रिव्हॉल्व्हर, स्कॉर्पियो कार अद्याप हस्तगत करण्यात आलेली नाही. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे उपायुक्त महेश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
तक्रारदार विकासक संतोष पाटील आणि प्रमोद केळुसकर या दोघांच्या वादात आपल्याला विनाकारण अडकविल्याचे नाईकने दंडाधिकाऱ्यांसमोर सांगितले. मात्र तुम्ही तेव्हा केळुसकरसोबत काय करत होता? असे विचारताच नाईक निरुत्तर झाला.