Chinchwad Bypoll Election Result 2023: चिंचवड विजयानंतर ‘लक्ष्मण जगताप अमर रहे’च्या घोषणा; माय-लेकींना अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 09:57 PM2023-03-02T21:57:15+5:302023-03-02T21:58:13+5:30
Chinchwad Bypoll Election Result 2023: अश्विनी जगताप आणि त्यांच्या मुलीने दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतिस्थळी जाऊन आदरांजली वाहिली.
Chinchwad Bypoll Election Result 2023: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत झाली होती. महाविकास आघाडीतील काटे-कलाटे मत विभागणीचा फायदा भाजपला झाला असून, चिंचवडमध्ये भाजपच्या आश्विनी जगताप या तब्बल ३६ हजार १६८ मतांच्या फरकाने १ लाख ३५ हजार ४३४ मते मिळवून विजयी झाल्या आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जिंकल्यानंतर भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांच्या मुलीने लक्ष्मण जगतापांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले. उपस्थितांनी ‘अमर रहे, अमर रहे, लक्ष्मण जगताप अमर रहे’ अशा घोषणा दिल्या. यावेळी माय-लेकींना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
अश्विनी जगताप यांनी दिवंगत लक्ष्मण जगताप यांना अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर डोके ठेवले. त्यावेळी त्या भावनिक झाल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांच्याबरोबर असलेल्या महिला कार्यकर्त्यांनी अश्विनी जगताप यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. अश्विनी जगताप यांच्यानंतर त्यांच्या मुलीनेही स्मृतीस्थळावर नतमस्तक होऊन वडिलांना आदरांजली वाहिली. मात्र, आईनंतर तिलाही भावना अनावर झाल्या आणि तिलाही अश्रू अनावर झाले. जगताप माय-लेकीला भावनिक झालेले पाहून कार्यकर्त्यांचेही डोळे पाणवले.
सर्वांसाठी आमचे दरवाजे खुले असतील
ही निवडणूक माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. आम्हा सर्वांना हा गड राखायचा होता. तो गड सर्वांनी राखला आहे. माझा सुरुवातीपासून सर्वांवर विश्वास होता. मी हा विजय दिवंगत लक्ष्मण जगताप आणि सर्व सामान्य नागरिकांना समर्पित करते. माझे वरिष्ठ नेते जेव्हा सांगतील तेव्हा मी अधिवेशनालाही येणार आहे. मी सर्वसामान्यांचा आमदार म्हणून काम करेन. सर्वांसाठी आमचे दरवाजे खुले असतील, असे अश्विनी जगताप यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा फायदा झाला का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अश्विनी जगताप म्हणाल्या की, नक्कीच, राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा मला फायदा झाला.
दरम्यान, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये महायुतीच्या वतीने अश्विनी जगताप, महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे नाना काटे आणि शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यासह २८ उमेदवार रिंगणात होते. या पोटनिवडणुकीत नाना काटे यांना ९९ हजार ३४३ यांना राहुल कलाटे यांना ४४ हजार ८२ मते मिळाली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम