राज्य मार्गांसाठी एशियन बँकेचे अर्थसहाय
By admin | Published: October 20, 2016 04:10 PM2016-10-20T16:10:23+5:302016-10-20T16:10:23+5:30
राज्य मार्गांवर कंत्राटदारांनी आधी रक्कम गुंतवावी व नंतर ५ टप्प्यात त्याचा परतावा घ्यावा, या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ‘अॅन्युटी’ योजनेला एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अर्थसहाय लाभणार आहे.
Next
>राजेश निस्ताने, ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. २० - राज्य मार्गांवर कंत्राटदारांनी आधी रक्कम गुंतवावी आणि नंतर पाच टप्प्यात त्याचा परतावा घ्यावा, या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ‘अॅन्युटी’ योजनेला एशियन डेव्हलपमेंट बँकेचे (एडीबी) अर्थसहाय लाभणार आहे.
महाराष्ट्रात राज्य मार्गांची अवस्था वाईट आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यामुळे तर ही अवस्था आणखीणच वाईट झाली. या रस्त्यांच्या बांधकामासाठी शासनाच्या तिजोरीत तेवढा पैसा नाही. टोल टॅक्समधून वसुली झाल्यास जनता त्याला विरोध करते. यावर पर्याय म्हणून ‘अॅन्युटी’ योजना आणली गेली. या योजनेत कंत्राटदारांना गुंतवणुकीचे आवाहन केले जाईल. त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यास एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून अर्थसहाय उपलब्ध करून दिले जाणार आहे. या संबंधी ६ आॅक्टोबर २०१६ रोजी शासनाने आदेश जारी केले. ‘अॅन्युटी’तील एडीबी अर्थसहाय योजनेतून राज्यात एकूण ३० कामे मंजूर करण्यात आली. त्यातून तीन हजार ३४ किलोमीटरचे रस्त्यांचे बांधकाम होणार आहे. त्यावर आठ हजार ४१५ कोटी रुपये खर्च केले जाईल. त्याचे तीन टप्पे पाडण्यात आले आहे.
अमरावती विभागाला १०५५ कोटी
अमरावती विभागाला एडीबी अर्थसहाय योजनेतून तीन टप्प्यात सहा कामे मंजूर झाली. यातून ४०६ किमीचे राज्य मार्ग बांधकाम होणार आहे. त्याचे बजेट १ हजार ५५ कोटी रुपयांचे आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील वाशिम-पुसद-महागाव-फुलसावंगी आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव मार्गांचे बांधकाम दुसºया टप्प्यात होणार आहे.
मुख्यमंत्री-गडकरींमध्ये दुमत
राज्य मार्ग बांधकामाच्या या योजनेत अमरावती विभागात पहिल्या टप्प्यात ६८५ कोटी रुपये हे नागपूर-मुंबई (मार्गे पुलगाव-देवगाव-शिंगणापूर-कारंजा-सिंदखेडराजा) या रस्त्यावर खर्च होणार आहे. २७४ किलोमीटरचे बांधकाम त्यातून होईल. मात्र या कामाच्या निवडीवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यात एकमत झाले नसल्याची माहिती आहे. याच राष्टÑीय महामार्गाला पर्याय म्हणून सूपर एक्सप्रेस-वेची घोषणा ना. गडकरी यांनी आधीच केली आहे. नागपूरहून सहा तासात मुंबईला पोहोचणे या सूपर-वेवरून शक्य होणार आहे. या वेवर लवकरच स्वतंत्र खर्च होणार असताना शिंगणापूर हायवेवर ६८५ कोटींचा खर्च कशासाठी या मुद्यावरून या दोन मंत्र्यांमध्ये दुमत झाल्याची बांधकाम सुत्राची माहिती आहे.
* पहिल्या टप्प्यामध्ये ९७७ किलोमीटर रस्त्याची ११ कामे असून त्यासाठी दोन हजार ५९४ कोटींचे बजेट आहे.
* दुसºया टप्प्यामध्ये एक हजार ८४ किलोमीटरची नऊ कामे असून त्याचे बजेट दोन हजार ८७२ कोटींचे आहे.
* तिसरा टप्पा हा दोन हजार ९४८ कोटींचा आहे. त्यात दहा कामे घेण्यात आली. त्यातून ९७४ किलोमीटरचे राज्य मार्गांचे बांधकाम होणार आहे.
राज्य मार्गांसाठी ‘अॅन्युटी’ योजनेत एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अर्थसहाय घेतले जाणार आहे. परंतु त्याबाबतचे धोरण अद्याप निश्चित झालेले नाही. या रस्त्यांसाठी शासन स्वत: कर्ज उभारणार की, कंत्राटदारांना कर्ज दिले जाणार हे अद्याप स्पष्ट नाही.
- सी.व्ही. तुंगे मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम अमरावती.