तवसाळात होणार आशियातील मोठा तेल शुद्धिकरण प्रकल्प
By admin | Published: October 25, 2015 11:25 PM2015-10-25T23:25:31+5:302015-10-26T00:09:50+5:30
अनंत गीते यांची घोषणा : लोकांच्या मर्जीनेच भूसंपादन करणार
शृंगारतळी : गुहागर तालुक्यात तवसाळ येथे हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन आॅईल अशा तीन कंपन्यांचा एकत्रित आशिया खंडातील सर्वांत मोठा, साठ दशलक्ष टन क्षमतेचा तेल शुद्धिकरण प्रकल्प आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, यासाठी मंत्रालयाची तत्वत: मान्यता मिळाली आहे, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी पाटपन्हाळे येथे रविवारी पत्रकार परिषदेत दिली.सध्या देशात जामनगर येथे ४८ मिलियन टनचा रिलायन्स कंपनीचा तेल शुद्धिकरण प्रकल्प आहे. यापेक्षा मोठाप्रकल्प गुहागर तालुक्यात होणार आहे. त्यासाठी सध्या शासनाच्या ताब्यात असलेल्या जागेपेक्षा अधिक जागा लागणार आहे. मात्र, लोकांच्या मर्जीने ती संपादन होणार आहे, असे गीते म्हणाले.
पूर्वी आपण हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीला प्रकल्पासाठी जागा दिली होती. मात्र, त्यावेळी पश्चिम घाट संरक्षण क्षेत्र असल्याने मॉरिटोरियम लागले होते. त्यामुळे या प्रकल्पाला परवानगी मिळत नव्हती. अखेर तो प्रकल्प राजस्थानला गेल्याचे गीते म्हणाले.
मुंबई-गोवा चौपदरीकरण रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत सत्तर टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबरअखेर शंभर टक्के काम पूर्ण होईल व डिसेंबरमध्ये कामाच्या निविदा मागवण्यात येतील, असे गीते यांनी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख सचिन कदम, बाळा खेतले, मंगेश पवार, अनंत चव्हाण, प्रल्हाद विचारे उपस्थित होते. (वार्ताहर)
केंद्रात दुजाभाव नाहीच
राज्य आणि केंद्रामध्ये सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये दुजाभाव आहे का? या प्रश्नावर गीते यांनी केंद्रात कोणताही दुजाभाव नसल्याचे स्पष्टीकरण दिले. मी केंद्रात आहे, तोपर्यंत युती तुटणार नाही, असेही त्यांनी सांगितले. मात्र, राज्यातील युतीच्या परिस्थितीबद्दल आपल्याला माहिती नाही, असे गीते म्हणाले.
ग्रामस्थांच्या मताची उत्सुकता
१९९६ मध्ये हिंदुस्थान ओमान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. (एचओपीसीएल) या कंपनीचा प्रकल्प तवसाळ येथे येणार होता. मात्र, त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांचा जोरदार विरोध झाला होता.
या आंदोलनात नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनीही भाग घेतला होता.
अखेरीस हे क्षेत्र पश्चिम घाट
संरक्षित क्षेत्रात येत असल्याने हा प्रकल्प रद्द झाला. आता या नवीन प्रकल्पाबाबत ग्रामस्थांचे मत
काय असणार आहे? याबाबत उत्सुकता आहे.