शेतकरी प्रश्नांवर शासनाला जाब विचारू
By admin | Published: June 6, 2016 12:43 AM2016-06-06T00:43:59+5:302016-06-06T00:43:59+5:30
राज्यातील शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा राज्य शासन पूर्ण करणार नसेल, तर या सरकारला आम्ही जाब विचारू आणि त्यांना जनतेच्या अपेक्षांची जाणीव करून देऊ
पुणे : राज्यातील शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा राज्य शासन पूर्ण करणार नसेल, तर या सरकारला आम्ही जाब विचारू आणि त्यांना जनतेच्या अपेक्षांची जाणीव करून देऊ, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले़
धनंजय मुंडे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार अनिल भोसले यांच्या वतीने शनिवारी शेतकी महाविद्यालयाच्या मैदानावर मुंडे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. हभप रामरावजीमहाराज ढोक यांच्या हस्ते फुले पगडी, घोंगडी, घुंगरकाठी आणि श्रीरामाची मूर्ती देऊन धनंजय मुंडे- राजश्री मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, नगरसेविका रेश्मा भोसले, नगरसेवक शिवलाल भोसले, शहाजी रानवडे उपस्थित होते.
धनंजय मुंडे म्हणाले, ‘‘विधान परिषदेची निवडून बिनविरोध व्हावी आणि पहिला सत्कार ढोकमहाराज आणि मोठे बंधू आमदार अनिल भोसले यांच्या हस्ते व्हावा, हा मला मिळालेला आशीर्वाद आहे़ दुष्काळी भागातील जनतेच्या व्यथा जाणून घेण्यासाठी मी व माझ्या सहकाऱ्यांनी दुष्काळी भागातील गावोगावं पिंजून काढले. आमदार अनिल भोसले यांनी मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या तब्बल दीड हजार शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजार रुपये मदत करून ती कुटुंब सावरण्याचा प्रयत्न केला परंतु त्याबद्दल अवाक्षरही काढले नाही.
अनिल भोसले म्हणाले, ‘‘धनंजय मुंडे हे बहुजनांचे नेतृत्व आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची तळमळ आणि त्यातून या जनतेचे सरकारदरबारी अभ्यासपूर्ण प्रश्न मांडण्याची पद्धत याचा ठसा त्यांनी विधान परिषदेत उमटविला आहे.’’