Vidhan Sabha 2019 : ७ मतदारसंघांत नवखे इच्छुक; तीन प्रस्थापित उमेदवार राहणार कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 04:36 AM2019-09-21T04:36:08+5:302019-09-21T04:38:57+5:30
शिवसेनेने जिल्ह्यातील सर्व ११ जागांसाठी इच्छूकांच्या मुलाखती घेतल्या
जळगाव : शिवसेनेने जिल्ह्यातील सर्व ११ जागांसाठी इच्छूकांच्या मुलाखती घेतल्या असून, यामध्ये जळगाव ग्रामीण, एरंडोल, मुक्ताईनगर व पाचोऱ्यात प्रस्थापितांनी उमेदवारीवर दावा केला असला तरी उर्वरीत आठ मतदारसंघासाठी सेनेकडून इच्छूकांनी गर्दी केली आहे. विशेष म्हणजे २०१४ मध्ये शिवसेनेकडून उभ्या असलेल्या उमेदवारांनी यंदा मुलाखती दिल्या नसून, त्यांच्याऐवजी नवख्या उमेदवारांनी मुलाखती दिल्याचे दिसून येत आहे. चाळीगावमध्ये शिवसेनेकडून तिघे इच्छुक आहेत.
पारोळा-एरंडोलसाठी माजी आमदार चिमणराव पाटील , जळगाव ग्रामीणमधून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, पाचोºयातून विद्यमान आमदार किशोर पाटील यांनी मुलाखत दिली. तर मुक्ताईनगर मतदारसंघात देखील जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनीच मुलाखत दिली आहे. २०१४ मध्ये देखील चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांना जोरदार टक्कर दिली होती. त्यामुळे यंदा येथे इच्छुकांची स्पर्धा नाही. रावेर, अमळनेर, जामनेर, भुसावळमध्ये मात्र स्पर्धा आहे.
>चोपडा व जळगाव शहरसाठी नवख्याला संधी
घरकुल प्रकरणी माजी आमदार सुरेशदादा जैन व चोपड्याचे विद्यमान आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांना शिक्षा झाल्यामुळे या दोन्ही जागांवर सेनेकडून इतर उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. चोपडा शहरासाठी विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता सोनवणे व त्यांचे बंधू श्यामकांत सोनवणे यांनी देखील मुलाखती दिल्या आहेत. तर जळगाव शहर मतदारसंघ युतीच्या काळात शिवसेनेकडेच राहिला आहे. २०१४ मध्ये युती तुटल्यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपाचे सुरेश भोळे विजयी झाले होते. दरम्यान, या जागेसाठी दोन्हीही पक्ष आग्रही आहेत.