अँस्पायरने दिला करिअर मंत्र
By admin | Published: June 8, 2014 01:01 AM2014-06-08T01:01:32+5:302014-06-08T01:22:29+5:30
बदलत्या काळात करिअरच्या कक्षा रु ंदावत चालल्या आहेत. योग्य वेळी करिअरच्या योग्य मार्गाची निवड केल्यास प्रगतीची शिखरे गाठता येतात. याकरिता आवश्यकता असते ती योग्य मार्गदर्शनाची.
‘लोकमत अँस्पायर एज्युकेशन फेअर-२0१४’ : विद्यार्थी, पालकांची उसळली गर्दी
नागपूर : बदलत्या काळात करिअरच्या कक्षा रु ंदावत चालल्या आहेत. योग्य वेळी करिअरच्या योग्य मार्गाची निवड केल्यास प्रगतीची शिखरे गाठता येतात. याकरिता आवश्यकता असते ती योग्य मार्गदर्शनाची. अन्यथा मनात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. हाच मुद्दा विचारात घेऊन ‘लोकमत’ ने पुढाकार घेऊन मोशन प्रस्तुत आणि वरसिटी सहप्रायोजित ‘लोकमत अँस्पायर एज्युकेशन फेअर-२0१४’चे आयोजन केले आहे. काँग्रेसनगर येथील धनवटे नॅशनल महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या विशेष शैक्षणिक प्रदर्शनात एकाच छताखाली विद्यार्थ्यांंंना करिअरच्या विविधांगी व बहुआयामी पर्यायांची माहिती उपलब्ध आहे. प्रदर्शनाच्या दुसर्या दिवशी विद्यार्थी आणि पालकांची गर्दी उसळली. या प्रदर्शनाचा उद्या रविवार शेवटचा दिवस आहे. दहावी, बारावीनंतरच्या विविध कोर्सची माहिती गेल्या काही वर्षांपासून ‘लोकमत’ एज्युकेशन फेअरच्या माध्यमातून देत आहे. या वर्षीच्या ‘अँस्पायर’मध्ये चाळीसच्यावर विविध शैक्षणिक संस्थांनी माहितीचा खजिना उपलब्ध करून दिला आहे. आपल्या पाल्याने कोणता कोर्स करावा, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती यासह सर्व शैक्षणिक संस्थांची परिपूर्ण माहिती देणारे तीन दिवसीय ‘लोकमत अँस्पायर एज्युकेशन फेअर’ शुक्रवारपासून सर्वांसाठी खुले झाले. या दोन दिवसांत चार हजाराच्यावर युवकांनी तर दीड हजार पालकांनी भेटी दिल्या आहेत. एरवी प्रत्येक शिक्षण संस्थेत जाऊन माहिती घेण्याकरिता प्रयत्न करणारे पालकही या प्रदर्शनाला आवर्जून भेट देत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांंसोबत पालकांनाही करिअर संदर्भातील मार्गदर्शन थेट तज्ज्ञांकडून मिळत आहे. या प्रदर्शनात सहभागी तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांंंना करिअरची दिशा दाखविली आहे.
इंजिनीअरिंग, मेडिकलच्या पलीकडे जग आहे
बारावीनंतर करिअरच्या तशा अनेक वाटा आहेत. आपल्याला नेमके काय करायचे आहे त्याचा विचार अगोदर करून ठेवला पाहिजे. त्यामुळे मनात गोंधळ तयार होत नाही. इंजिनीअरिंग आणि मेडिकलच्या पलिकडेही अनेक कोर्सेस आहेत. त्या बाबतही विचार करायला हवा. विद्यार्थ्यांंंनी घाईत कोणताही निर्णय न घेता विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक आपले करिअर निवडावे, असे मत प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक मोशनचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद वालवांढरे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, पूर्वी विदर्भातील विद्यार्थ्यांंंना इंजिनीअरिंग व मेडिकलच्या विद्यार्थ्यांंंना परीक्षेची तयारी करण्यासाठी कोटा येथे जावे लागत असे. मात्र ‘मोशन’च्या नागपूर केंद्राने विद्यार्थ्यांंंना ही दज्रेदार सुविधा नागपुरातच उपलब्ध करून दिल्याने, विद्यार्थी व पालकांच्या वेळेची व पैशाची बचत झाली आहे. मोशनचा आजपर्यंंंतच्या प्रगतीचा आलेख बघता नागपुरातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये बाजी मारत आहे. मोशनचे हे नागपुरातील दुसरे वर्षे आहे. मोशन ब्रॅण्डचा विचार केल्यास आतापर्यंंंत ५0 हजारावर विद्यार्थ्यांंंनी प्रवेश घेतला आहे. ‘लोकमत’चा हा उपक्रम विद्यार्थ्यांंंसाठीच नाही तर त्यांच्या पाल्यांसाठी उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांंंना चांगले शिक्षण मिळावे हा आमचा मुख्य उद्देश आहे.
स्वत:च्या आवडीचा शोध घ्या- प्रसाद बनारसे
आपल्याला जीवनात काय व्हायचे आहे, कोणत्या मार्गाने जायचे आहे, आपली आवड कशात आहे, याचा शोध विद्यार्थ्यांंंंनी करिअर निवडताना घ्यावा, असे आवाहन पुणे येथील मिडास संस्थेचे कला शाखा संचालक प्रसाद बनारसे यांनी केले. ते आज, शनिवारी ‘लोकमत अँस्पायर एज्युकेशन फेअर’मध्ये आयोजित ‘भारतातील उदयोन्मुख व कल्पक करिअर’ विषयावरील मार्गदर्शन सत्रात बोलत होते.
बनारसे म्हणाले, विद्यार्थ्यांंंनी एकदा आपल्याला काय करायचे आहे, याचा शोध घेतला तर त्यांना जीवनात यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. बरेच विद्यार्थी दुसर्याने सांगितले म्हणून एखाद्या पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेतात. यानंतर त्यांचा हिरमोड होतो. अभ्यासात मन लागत नाही. अशावेळी ते आपल्या यशापयशाचे खापर सल्ला देणार्या व्यक्तीच्या डोक्यावर फोडतात. आपल्या जीवनात ही वेळच येणार नाही, याचा विचार विद्यार्थ्यांंंंनी करावा. आज विविध नवीन क्षेत्र पुढे आले आहेत. प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्याची संधी आहे. परंतु करिअर निवडताना स्वत:ची आवड ओळखणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांंंंनी उद्योजकाप्रमाणे विचार करायला शिकले पाहिजे. उत्तरे पाठांतर केल्याने कोणी ज्ञानी होत नाही. त्यासाठी विषय समजणे आवश्यक आहे. आज इंटरनेटवर हवी ती माहिती उपलब्ध आहे. या माहितीचे ज्ञानात रूपांतर करता आले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
यशासाठी परिश्रम आवश्यक- हितेश मोघे
परिश्रम घेतल्याशिवाय कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकत नाही, असे मुंबई येथील विद्यालंकार संस्थेचे गणित विभागप्रमुख हितेश मोघे यांनी सांगितले. त्यांनी आज, शनिवारी ‘लोकमत अँस्पायर एज्युकेशन फेअर’मध्ये ‘इंजिनिअरिंग व मेडिकलमध्ये भविष्य घडविण्याचा मार्ग व दिशा’ विषयावर विद्यार्थ्यांंंंना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर विद्यालंकार नागपूर शाखेच्या संचालक जयश्री काळे उपस्थित होत्या. मोघे म्हणाले, कोचिंग क्लासेस कितीही चांगले असले तरी विद्यार्थ्यांंंंच्या यशात त्यांचा वाटा ४0 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. परिश्रम हेच विद्यार्थ्यांंंंच्या यशाचे गमक असते. आजकाल जिकडे-तिकडे कोचिंग क्लासेसचे पीक आले आहे. यामुळे कोचिंग क्लासेसची निवड करताना शिक्षकांची गुणवत्ता, स्वयंमूल्यमापन, विविध प्रकारच्या चाचण्या, वेिषण, पालक सभा, शंकांचे समाधान, समूह चर्चा इत्यादी निकषांचा विचार करावा. शिक्षण मंडळाच्या परीक्षा व स्पर्धा परीक्षांमध्ये फरक आहे. मंडळाच्या परीक्षेत पूर्ण प्रश्न समजला नाही तरी उत्तर लिहिता येते. स्पर्धा परीक्षेत तसे करता येत नाही. स्पर्धा परीक्षेतील प्रश्न गोंधळ उडविणारे असतात. परिणामी विद्यार्थ्यांंंंच्या संकल्पना अत्यंत स्पष्ट असणे आवश्यक आहे. देशात इंजिनिअरिंगसाठी आयआयटी, तर मेडिकलसाठी एम्स ही सवरेत्कृष्ट संस्था आहे. या दोन्ही शाखांमध्ये करिअर करण्यासाठी अकरावी व बारावीमध्येच मनापासून परिश्रम घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.