पंढरपुरातील विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या व्यवस्थापकाला बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2017 12:30 PM2017-08-14T12:30:13+5:302017-08-14T12:47:32+5:30
पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. दर्शनासाठी मंदिरात न सोडल्याच्या रागातून मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.
सोलापूर, दि. 14 - पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेत महाजन गंभीर जखमी झाल्याचे समजत आहे. दर्शनासाठी मंदिरात न सोडल्याच्या रागातून मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.
रविवारी रात्री 11:30 वाजता मंदिरातून कामकाज संपवून दुचाकीवरून घराकडे निघालेल्या व्यवस्थापक विलास महाजन यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं हल्ला केला. अज्ञातानं केलेल्या मारहाणीत महाजन गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर तातडीनं महाजन यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले गेले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
परिवहन मंत्री दिवाकर रावते हे पंढरपुरात दर्शनासाठी आले असता त्यांच्या स्वागतासाठी महाजन मंदिरात गेले होते. मंदिरातून घराकडे परतत असताना त्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी महाजन यांची भेट घेतली असून सध्या गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
काही दिवसापूर्वीच हंगामी कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक यांच्यातही मंदिरातच दर्शनासाठी माणसे सोडण्यावरून वाद झाला होता. यानंतर आता थेट वरिष्ठ अधिका-यांना मारहाण होण्यापर्यंत घटना घडू लागल्या आहेत.