विधानसभा २०२४: एकाच घरात दाेन पक्ष! राणे, नाईकांच्या कुटुंबात उमेदवारीसाठी वेगळे तंबू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 09:19 AM2024-10-23T09:19:10+5:302024-10-23T09:20:07+5:30

भुजबळ कुटुंबातही नवीन ट्रेंडची चर्चा

Assembly 2024: Right Party in One House! Rane, a separate tent for candidacy in the Naik family | विधानसभा २०२४: एकाच घरात दाेन पक्ष! राणे, नाईकांच्या कुटुंबात उमेदवारीसाठी वेगळे तंबू

विधानसभा २०२४: एकाच घरात दाेन पक्ष! राणे, नाईकांच्या कुटुंबात उमेदवारीसाठी वेगळे तंबू

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्याच्या राजकारणात मंगळवारी नवीन ट्रेंड पाहायला मिळाला. विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी सख्खे नातेवाईक कुठे मित्रपक्षात तर कुठे विरोधी पक्षाच्या तंबूत गेले. वडील-मुलगा, भाऊ-भाऊ यांच्याबाबत ते प्रत्यक्ष घडले, तर काका-पुतण्याबाबत तसे घडणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

नवीन ट्रेंडची चर्चा

गणेश आणि संदीप नाईक

माजी मंत्री गणेश नाईक यांना भाजपने नवी मुंबईच्या ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांचे पुत्र संदीप नाईक यांनी मंगळवारी शरद पवार गटात प्रवेश केला. संदीप हे बाजूच्या बेलापूर मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार आणि नाईक विरोधक मंदा म्हात्रे यांच्याविरुद्ध लढतील. त्यामुळे वडील भाजपकडून तर मुलगा बाजूच्या मतदारसंघात शरद पवार गटातून लढणार हे स्पष्ट झाले.

नीलेश आणि नितेश राणे

माजी केंद्रीय मंत्री, खा. नारायण राणे यांचे पुत्र नीलेश बुधवारी शिंदेसेनेत प्रवेश करतील. त्यांना शिंदेसेनेची कुडाळमधून (जि. सिंधुदुर्ग) उमेदवारी मिळेल. राणेंचे दुसरे पुत्र नितेश यांना भाजपने कणकवलीतून आधीच उमेदवारी दिली आहे. राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना नीलेश यांच्या उमेदवारीसाठी गळ घातली होती. आता नीलेश यांच्या कुडाळ उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.

छगन भुजबळ आणि पुतणे समीर भुजबळ

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना अजित पवार गटाने येवला (जि. नाशिक) मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. भुजबळ यांचे पुतणे समीर हे याच जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघात शरद पवार गटाकडून लढणार असल्याची चर्चा आहे. नांदगावमध्ये शिंदेसेनेचे सुहास कांदे हे आमदार आहेत. बंडाच्या पवित्र्यात असलेले समीर भुजबळ यांना अजित पवार यांनी पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला सांगितल्याची चर्चा होती. मात्र, अशी कोणतीही सूचना अजित पवार यांनी केलेली नाही, असे छगन भुजबळ यांनी लोकमतला सांगितले.

इंद्रनील व ययाती नाईक: नाईक घराण्याचे वर्चस्व असलेल्या पुसद विधानसभा मतदारसंघात यंदाही नाईक बंधू आमने-सामने येण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे विद्यमान आमदार इंद्रनील नाईक पुन्हा तयारी करीत आहेत. तर दुसरीकडे इंद्रनील यांचे मोठे बंधू जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक हे महाविकास आघाडीकडून तिकिटासाठी प्रयत्नशील आहेत.

महायुतीत एकमेकांना उमेदवारांचा पुरवठा

भाजपचे बडोले अजित पवारांकडे

महायुतीमध्ये एकमेकांना उमेदवार पुरविण्याचा एक्स्चेंज प्रोग्राम मंगळवारी पहायला मिळाला. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मतदारसंघात माजी मंत्री व भाजपचे नेते राजकुमार बडोले यांनी मंगळवारी अजित पवार गटात प्रवेश केला. तेथे या गटाचे मनोहर चंद्रिकापुरे आमदार आहेत पण त्यांच्या जागी आता बडोले हे अजित पवार गटाचे (महायुती) उमेदवार असतील. बडोले सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि दुपारी ते अजित पवार गटात गेले.

वरुड-मोर्शी बदल्यात अमरावती

अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शीत अजित पवार गटासोबत असलेले अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडे आहे. पण ही जागा भाजपला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. तेथे उमेश (चंदूभाऊ) यावलकर हे भाजपचे उमेदवार असतील अशी माहिती आहे. भाजपने गेल्यावेळी अमरावती शहरची जागा लढविली होती, ती यावेळी अजित पवार गटाला दिली आहे. सुलभा खोडके तिथे उमेदवार असतील. अमरावतीच्या बदल्यात वरुड-मोर्शी भाजप घेणार, असे चित्र आहे.

बाळापूरमध्येही प्रयोग शक्य

बाळापूरची (जि. अकोला) जागा शिंदेसेनेला हवी आहे पण तेथील शिंदेसेना जो उमेदवार देऊ इच्छिते त्याऐवजी दुसरे नाव भाजपने सुचविले आहे. तसे झाले तर तेथेही एक्स्चेंज प्रोग्राम होईल. मात्र, ही जागाच आपल्याला मिळावी यासाठी भाजप अडला आहे.

सावंतवाडीमध्ये तिरंगी लढतीची शक्यता अधिक

अनंत जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, सावंतवाडी: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणिते दिवसेंदिवस बदलत चालली आहेत. सहा महिन्यांपूर्वी बहुरंगी वाटणारी लढत आता तिरंगी होण्याची शक्यता आहे. या तिरंगी लढतीत अपक्ष उमेदवार म्हणून विशाल परब यांनी उमेदवारी दाखल केली, तर सावंतवाडी विधानसभेत चुरस निर्माण होणार आहे. त्यातच महाविकास आघाडीत उद्धवसेनेला एकाकी लढत द्यावी लागेल की काय, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. महायुतीत शिंदे सेनेच्या दिमतीला भाजपची ताकद असून, राणे फॅक्टर कामाला येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एकंदरीत सलग चौथ्यांदा निवडणूक रिंगणात असणारे शालेय शिक्षणमंत्री तथा शिंदेसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची ठरणार आहे.

निवडणुकीच्या तोंडावर राजकारण बदलत गेले. सावंतवाडीच्या राजकारणात ट्विस्ट आला. भाजपचे राजन तेली थेट उद्धवसेनेत गेले. आता त्यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. त्यामुळे अर्चना घारे-परब, रूपेश राऊळ ही नावे मागे पडली आहेत.

Web Title: Assembly 2024: Right Party in One House! Rane, a separate tent for candidacy in the Naik family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.