"तुमचं तुम्ही लढा"; रामदास कदमांच्या वक्तव्यावर भाजप म्हणतं, "आम्हाला युतीची गरज हा गैरसमज"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 01:57 PM2024-08-19T13:57:46+5:302024-08-19T14:14:52+5:30

मंत्री रवींद्र चव्हाण कुचकामी असल्याचे म्हणत त्यांचा राजीनामा घ्यायला हवा अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला.

Assembly Election Praveen Darekar criticism of Ramdas Kadam over Mahayuti | "तुमचं तुम्ही लढा"; रामदास कदमांच्या वक्तव्यावर भाजप म्हणतं, "आम्हाला युतीची गरज हा गैरसमज"

"तुमचं तुम्ही लढा"; रामदास कदमांच्या वक्तव्यावर भाजप म्हणतं, "आम्हाला युतीची गरज हा गैरसमज"

Ramdas Kadam On Mahayuti : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना महायुतीमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. विधानसभेसाठी सर्वच पक्ष रणनिती आखत असताना महायुतीच्या नेत्यांमध्ये हमरातुमरी सुरु झालीय.  शिवसेनेचे माजी आमदार रामदास कदम आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात गोवा मुंबई हायवेवरुन वाद सुरु असताना महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. राक्षसी महत्त्वाकांक्षा असेल तर युती तोडावी. तुमचं तुम्ही लढा आमचं आम्ही लढतो. प्रत्येक मतदारसंघावर दावा सांगितला जात आहे, असं म्हणत रामदास कदम यांनी भाजपवर निशाणा साधला. तर त्याला प्रत्युत्तर देताना भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी भाजपला युतीची गरज आहे हा गैरसमज असल्याचे म्हटलं आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरुन रामदास कदम यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली. रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री असून त्यांना आवर घाला, ते युती तोडण्याचं काम करतायेत असा आरोप शिवसेना नेते रामदास कदमांनी केला. तसेच युतीमध्ये तुमच्या राक्षसी महत्वाकांक्षा असतील तर युती तोडून स्वतंत्र लढा असे रामदास कदम यांनी झी २४ तास सोबत बोलताना म्हटलं. आता यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी रामदास कदमांना प्रत्युत्तर दिलं आहे.

"रामदास कदम यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याने अपरिपक्व वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्यांचे काहीही म्हणणं असेल ते त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना चार भितींच्या आत सांगून त्यावर मार्ग काढावा. पण रामदास कदम यांचा स्वभाव अशाप्रकारची खळबळजनक वक्तव्ये करायची आणि वाद निर्माण करायचा असा आहे. तुम्ही बोललात तर आम्हालाही बोलता येतं. रवींद्र चव्हाणांच्या बाबतीत आधी तुम्ही वक्तव्ये केलीत. महायुतीत धर्म पाळायला हवा. तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करायची. रायगड रत्नागिरी आमचं सांगता. मग भाजपच्या कार्यकर्त्यांची पण अस्वस्थता समजून घ्या. ठाण्यात तीन आमदार आमचे आहेत. नरेश म्हस्केंना, रवींद्र वायकरांना खासदार आमच्या लोकांनी केले. तुम्हाला नाशिक, डोंबिवलीची जागा दिली. उणीदुणी काढलीत तर आमचीही तयारी आहे. युतीची गरज सगळ्यांना आहे. उद्या आमच्या बाजूनीही बोलतील. रामदास कदमांनी चांगल्या वातावरणात मिठाचा खडा टाकू नये. भाजपला युतीची गरज आहे अशा भ्रमात ते असतील तर तो त्यांचा गोडगैरसमज आहे," असं प्रवीण दरेकर म्हणाले.

आम्ही सहन करायला बसलेलो नाही - प्रवीण दरेकर

"रामदास कदम यांची वैयक्तिक कारणातून आलेली खदखद आहे. रामदास कदम यांचा मुलगा ज्या ठिकाणी आमदार आहे त्याठिकाणी  भाजप नसेल तर निवडूण येणे अवघड होणार आहे. रामदास कदमांच्या मुलाला मंत्री व्हायचं होतं. मुलगा मंत्री न झाल्याने ते बैचेन आहेत. त्यामुळे ते वैफल्यातून खदखद बाहेर येत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांचा संयम आहे याला तुम्ही आमचा दुबळेपणा समजू नका. भाजप राष्ट्रीय पक्ष आहे. सारख्या हुलकावण्या मारणार असाल तर आम्ही सहन करायला बसलेलो नाही," असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला.

Web Title: Assembly Election Praveen Darekar criticism of Ramdas Kadam over Mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.