राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 22:00 IST2024-11-06T21:59:46+5:302024-11-06T22:00:21+5:30
Sharad pawar speech in MVA:

राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
मुंबईतील महाविकास आघाडीच्या सभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी महिलांवरील अत्याचारावरून राज्य सरकारवर टीका केली. एकेकाळी कायदा सुव्यस्थेबाबत मोलाची कामगिरी करणाऱ्या राज्यात ६४ हजार महिला बेपत्ता असल्याचा आरोप पवार यांनी केला. तसेच महिलांवरील अत्याचारातही वाढ झाल्याचे ते म्हणाले. तसेच ठाकरेंचा सत्ताकाळ सोडला तर गेली अडीच वर्षे महाराष्ट्राला मागे नेणारा काळ होता असेही पवार म्हणाले.
शिक्षणासाठी महाराष्ट्र ओळखला जात होता. परंतू तिथे भ्रष्टाचार सुरु आहे. गुंतवणुकीत मागे पडला, दरडोई उत्पन्नात मागे पडला. भ्रष्टाचार टोकाला गेला आहे. याचे जिवंत उदाहरण सिंधुदूर्गमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळला ते आहे. पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण झाले आणि तोच पुतळा पडला. आमच्या शिवछत्रपतींचा अपमान झाला, असा आरोप पवार यांनी केला. तसेच लोकसभेला जशी शक्ती दिली तशी विधानसभेलाही द्या, असे आवाहन पवार यांनी केले.
मोदींनी पंतप्रधान होण्यासाठी १५ लाख रुपये देण्याची गॅरंटी दिली होती. २ कोटी रोजगार देणार होते. एमएसपी दुप्पट करणार होते. पण त्यांनी यापैकी काहीच केलेले नाही. यांची गॅरंटी फक्त अदानी, अंबानींसाठी, असा टोला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लगावला.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. पटोले म्हणाले, राहूल गांधी जे संविधान दाखवतात त्या लाल रंगावरुन फडणवीस यांनी नक्षलवादी म्हटल, मात्र आमच्या हिंदू धर्मात लाल रंग हा पवित्र मानला जातो, असा पलटवार पटोले यांनी केला.
महाविकास आघाडीच्या ५ गॅरेंटी काय आहेत?
महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३००० रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास.
• शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन.
• जातनिहाय जनगणना करणार, ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील.
• २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे.
• बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४००० रुपयांपर्यंत मदत.