महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त दिवाळीनंतरच! ‘लोकमत’ने सर्वप्रथम दिले होते वृत्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 07:29 AM2024-08-17T07:29:21+5:302024-08-17T07:30:17+5:30

पाऊस, सणासुदीच्या दिवसांचे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले कारण

Assembly elections in Maharashtra after Diwali! Lokmat was the first to give the news | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त दिवाळीनंतरच! ‘लोकमत’ने सर्वप्रथम दिले होते वृत्त

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त दिवाळीनंतरच! ‘लोकमत’ने सर्वप्रथम दिले होते वृत्त

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरयाणातील निवडणुकीच्या तारखांची शुक्रवारी घोषणा करताना महाराष्ट्रविधानसभा निवडणुकीची घोषणा मात्र केली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणूक ही दिवाळीनंतरच म्हणजे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार या चर्चेला बळ मिळाले आहे. 

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दोन राज्यांची निवडणूक जाहीर केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना महाराष्ट्रातील निवडणूक कधी घेणार, असा प्रश्न केला असता त्यांनी स्पष्ट केले की, २०१९ मध्ये महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणूक एकत्रितपणे घेण्यात आली होती. त्यावेळी जम्मू-काश्मीरची निवडणूक हा विषयच नव्हता. मात्र, आता आम्हाला पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक घ्यायची आहे. त्यातील जम्मू-काश्मीर, हरयाणाची निवडणूक आम्ही जाहीर केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र, झारखंड या दोन राज्यांची निवडणूक यावर्षी घ्यायची आहे. पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला दिल्ली विधानसभेची निवडणूक व्हावयाची आहे. महाराष्ट्रात मोठा पाऊस पडत आहे आणि सणासुदीचेही दिवस आहेत असे म्हणत राजीव कुमार यांनी नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल असे संकेतच एकप्रकारे दिले. 

‘लोकमत’ने सर्वप्रथम दिले होते वृत्त

महाराष्ट्रात निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होईल, असे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने १३ ऑगस्टच्या अंकात दिल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर विविध माध्यमांनी अशाच बातम्या दिल्या. केंद्रीय निवडणूक आयोग शुक्रवारी तातडीची पत्र परिषद घेणार असे वृत्त येताच महाराष्ट्राची निवडणूकही आजच जाहीर होणार अशा बातम्या पसरल्या. प्रत्यक्षात तसे झाले नाही. 

Web Title: Assembly elections in Maharashtra after Diwali! Lokmat was the first to give the news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.