Assembly Elections Results 2019: दानवेंनी मदत करूनही खोतकरांचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 10:25 PM2019-10-24T22:25:23+5:302019-10-24T22:26:52+5:30
लोकसभा निवडणुकीत खोतकर यांनी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून विधानसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांचे काम केले.
मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात चांगलीच गट्टी जमली होती. लोकसभा निवडणुकीत खोतकर यांनी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून दानवे देखील खोतकरांसाठी जालन्यात विधानसभा निवडणुकीत ताकद लावताना पाहायला मिळाले होते. मात्र दानवेंची मदत मिळूनही खोतकरां ना आपला गड कायम राखता आला नाही.
जालना विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांचा पराभव झाला असून काँग्रेसचे कैलाश गोरंट्याल २५३४८ मतांनी पराभूत केले आहे. खोतकर यांच्याकडे राज्यमंत्री पद असल्याने आणि ग्रामीण भागात वाढता संपर्क असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, मागच्या पराभवाने खचून न जाता गोरंट्याल यांनी मतदारसंघाची बांधणी केली. तसेच त्यांचे अजातशत्रू व्यक्तिमत्व असल्याने जालना शहरातील व्यापारी वर्ग त्यांच्याकडे वळला. त्यामुळे याचा फटका खोतकर यांना बसल्याची चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी खोतकर आणि दानवे यांच्यातील वितुष्ट विकोपाला गेले होते. त्यावेळी दानवे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेत दोघांची समेट घडवून आणली. त्यानंतर खोतकर यांनी दानवेंसाठी जालना जिल्हा पिंजून काढला आणि दानवेंचा सहज विजय झाला.
लोकसभा निवडणुकीत खोतकर यांनी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून विधानसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांचे काम केले. त्यांच्या प्रचारार्थ विविध सभा आणि बैठका सुद्धा घेतल्या. मात्र एवढे करूनही खोतकर यांना विजय मिळवता आला नाही. तर त्यांचा काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी २५३४८ मतांनी पराभूत केले. अर्जून खोतकर यांना ६६४९७ मते मिळाली तर कैलास गोरंट्याल यांना निर्णायक ९१८३५ मते मिळाली आहे.