Assembly Elections Results 2019: प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात भाजपला भोपळा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 12:45 PM2019-10-26T12:45:52+5:302019-10-26T12:47:03+5:30
विधानसभा निवडणुकीत १०५ ठिकाणी विजय मिळवणाऱ्या भाजप पक्षाला कोल्हापूर जिल्ह्यात भोपळा ही फोडता आला नाही.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालाने अनेक दिग्गज नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. तर प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच भाजपला मोठा धक्का बसला असून, दोन्ही जागांवर पराभव स्वीकारावा लागला आहे. कोल्हापूरमध्ये युतीच्या १० ही जागा निवडून येणार असल्याचा दावा करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना स्वता:चा जिल्ह्यात पक्षाचा एकही उमेदवार निवडून आणता आला नाही.
विधानसभा निवडणुकीत १०५ ठिकाणी विजय मिळवणाऱ्या भाजप पक्षाला कोल्हापूर जिल्ह्यात भोपळा ही फोडता आला नाही. विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे होमपीच म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. मात्र असे असताना सुद्धा कोल्हापूर दक्षिणमधून आणि इचलकरंजीतून भाजपच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण १० पैकी २ ठिकाणी भाजपचे उमेदवार युतीकडून रिंगणात होते. कोल्हापूर दक्षिणमधून अमोल महाडिक तर इचलकरंजीतून सुरेश हळवणकर मैदानात होते. मात्र हाती आलेल्या निकालानंतर भाजपने आपल्या या दोन्ही जागा गमावल्या आहेत. विशेष म्हणजे कोल्हापूर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा जिल्हा असल्याने सर्व राज्याचे याकडे लक्ष लागले होते.
कोल्हापूर दक्षिणमधून काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी १ लाख ४० हजार १०३ मते मिळवली असून भाजपचे अमोल महाडिक यांचा ४२ हजार ७०९ मतांनी पराभव झाला आहे. तर इचलकरंजी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडे यांनी १ लाख १६ हजार ८८६ मते मिळवली असून भाजपचे उमेदवार सुरेश हलवणकर यांना ६७ हजार ७६ मते मिळाली आहेत. तर हलवणकर यांचा ४९ हजार ८१० मतांनी पराभव झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात भाजपल एकही उमेदवार निवडून आणता आला नाही.