विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 08:44 PM2024-10-16T20:44:17+5:302024-10-16T20:44:50+5:30

ऑफलाईन तसेच ऑनलाईन दोन्ही पद्धतीने मतदार आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकतात.

Assembly Elections When can voters in Maharashtra register | विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख

विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख

Maharashtra Vidhan Sabha Election ( Marathi News ) : केंद्रीय निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये   दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी एका टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज असून मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी येथे केले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमा संदर्भात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत एस. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी विजय राठोड उपस्थित होते.
 
अजूनही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना  दि. 19 ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करण्याची संधी अद्याप उपलब्ध असून ऑफलाईन तसेच ऑनलाईन दोन्ही पद्धतीने मतदार आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकतात. निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या 10 दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच दि. 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र. 6 मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील. तरी या संधीचा लाभ घेऊन सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करत मतदानाचा आपला हक्क आर्वजून बजावावा, असे आवाहन चोक्कलिंगम यांनी केले.

निवडणूक कार्यक्रमाची रुपरेषा

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक  सन 2024 ची अधिसूचना मंगळवार दि. 22 ऑक्टोबर 2024 रोजी राजपत्रात निर्गमित करण्यात येईल. तर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी पर्यंत आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी बुधवार दि. 30 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात येईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत सोमवार दि. 4 नोव्हेंबर 2024 रोजी पर्यंत आहे. बुधवार दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून शनिवार दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी करण्यात येईल. सोमवार दि. 25 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. त्याचप्रमाणे राज्यातील लोकसभेच्या 16 – नांदेड या एका लोकसभा मतदारसंघात सुद्धा पोटनिवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती एस.  चोक्कलिंगम यांनी यावेळी दिली.


 

Web Title: Assembly Elections When can voters in Maharashtra register

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.