विधानसभेचे सभागृह रिते झाले
By admin | Published: February 17, 2015 02:17 AM2015-02-17T02:17:43+5:302015-02-17T02:17:43+5:30
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस दिवंगत प्रमोद महाजन २००४ सालच्या निवडणूक प्रचाराच्या काळात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा करताना म्हणाले होते की, राजकारणात विरोधक असतात...
संदीप प्रधान - मुंबई
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस दिवंगत प्रमोद महाजन २००४ सालच्या निवडणूक प्रचाराच्या काळात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा करताना म्हणाले होते की, राजकारणात विरोधक असतात... विरोध करायचाच असतो... मात्र महाराष्ट्राच्या विधानसभेत आमच्या गोपीनाथबरोबर विलासराव नसतील, आर. आर. पाटील नसतील तर तुम्हा पत्रकारांना तरी ते सभागृह कव्हर करायला मजा येईल का? दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ही भूमिका मांडणारे महाजन यांची लागलीच हत्या झाली तर विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे आणि आता आर. आर. पाटील यांनीही नियतीच्या आदेशावरून कायमचा सभात्याग केला आणि विधानसभेचे सभागृह रिते झाले...
राज्यातील विधानसभा निवडणुकीकरिता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी त्या वेळी झडत होत्या. विलासरावांना निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदावरून दूर केले होते. त्या वेळी विलासरावांना लक्ष्य करण्याबाबत महाजन यांना विचारले असता त्यांनी त्यांच्या मनातील सत्ताधारी-विरोधक संघर्षाची भावना अशी मोकळेपणाने मांडली होती. त्यानंतर अल्पावधीत महाजन यांच्यावर त्यांचे बंधू प्रवीण यांनी गोळ्या झाडल्या. मृत्यूशी
११ दिवस झुंज दिल्यावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भाजपातील महाजन-मुंडे पर्व महाजन यांच्या निधनाने संपले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद सर्वाधिक काळ सांभाळण्याचे शरद पवार यांचे रेकॉर्ड विलासराव देशमुख यांनी मोडले.
२००९च्या निवडणुकीपूर्वी देशमुख यांनी माणिकराव ठाकरे यांना प्रदेशाध्यक्षपदी आणले होते. मात्र अचानक २००८ साली मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आणि अगदी अखेरच्या क्षणी राम गोपाल वर्मा यांच्यासोबत ट्रायडंट हॉटेलला दिलेल्या भेटीमुळे देशमुखांचे पद गेले. देशमुख यांच्या कारकिर्दीला येथून उतरती कळा लागली. त्यांच्या प्रकृतीबाबत कुजबुज सुरू झाली. देखणे, रूबाबदार विलासराव कृष अवस्थेत पाहिल्यावर अनेकांना धक्का बसला. त्यानंतर त्यांचे निधन झाले. महाजन यांच्या पश्चात भाजपाने जवळपास एक तप संघर्ष केल्यावर केंद्रात भाजपाची सत्ता आली.
गोपीनाथ मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रयत्नपूर्वक का होईना समावेश झाला. ग्रामविकासासारखे आवडीचे खाते मुंडे यांना मिळाले. परंतु दिल्लीत अचानक झालेल्या मोटार अपघातात मुंडे यांचे निधन झाले.
आर. आर. पाटील यांचे नव्या
सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर राष्ट्रवादीच्या वतीने एकमेव भाषण झाले. कालपर्यंत आम्ही सत्ताधारी होतो आज आम्ही विरोधात आहोत पण पाच वर्षांत आम्ही पुन्हा सत्ताधारी असू, असे ठणकावून सांगणारे आबा त्यांच्या काही साथीदारांबरोबर ‘सभात्याग’ करून निघून गेले... पुन्हा सत्ताधारी बाकावर बसण्याचा निर्धार मागे सोडून....