दोनच दिवस अधिवेशन; विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंकडूनच नाराजी व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 02:11 AM2020-12-15T02:11:57+5:302020-12-15T06:48:09+5:30
नियमित अधिवेशन घेण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी मिळून नियमावली ठरवायला हवी आणि पुढचे अधिवेशन पूर्ण काळासाठी व्हायला हवे या शब्दात त्यांनी कान टोचले.
मुंबई : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन केवळ दोनच दिवस होत असल्याबद्दल विरोधक टीका करीत असताना विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही त्याबाबत नाराजी व्यक्त केली. नियमित अधिवेशन घेण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी मिळून नियमावली ठरवायला हवी आणि पुढचे अधिवेशन पूर्ण काळासाठी व्हायला हवे या शब्दात त्यांनी कान टोचले.
भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. त्यांनी, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने सभागृहात करण्यात आलेल्या नियोजनाची उपरोधिकपणे स्तुती करत कौतुक केले. कोरोनाचा बाप काय आजोबा आाला तरी काही होणार नाही अशी व्यवस्था या ठिकाणी असल्याचे ते म्हणाले, पण अधिवेशन केवळ दोनच दिवसांचे का, असा सवाल त्यांनी केला. जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होणार नसेल, मांडलेल्या विधेयकांवरही चर्चा करता येणार नसेल तर अधिवेशन कशासाठी, असा सवाल त्यांनी केला.
हा धागा पकडून अध्यक्ष पटोले म्हणाले की, अधिवेशनाचा कालावधी कमी असल्याने आमदारांना आपले अधिकार राखता येत नाहीत. तसेच जनतेचे प्रश्नांवर चर्चा करण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे सरकार आणि विरोधकांनी एकत्रित बसून नियमित अधिवेशन कसे घेता येईल यादृष्टीने नियमावली तयार करावी, असे निर्देश देत आगामी अधिवेशन हे नियमित स्वरूपाचे झाले पाहिजे, असे बजावले.