मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तब्बल ५५० कोटींची मदत, ५६ हजार रुग्णांना सहाय्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 05:50 AM2019-06-23T05:50:19+5:302019-06-23T05:50:30+5:30

राज्यातील गरीब व गरजू रुग्ण केवळ पैशांअभावी वैद्यकीय सेवांपासून वंचित राहू नयेत

Assistance of 550 crores, assistance to 56 thousand patients from the Chief Minister's Assistance Fund | मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तब्बल ५५० कोटींची मदत, ५६ हजार रुग्णांना सहाय्य

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तब्बल ५५० कोटींची मदत, ५६ हजार रुग्णांना सहाय्य

googlenewsNext

मुंबई  - राज्यातील गरीब व गरजू रुग्ण केवळ पैशांअभावी वैद्यकीय सेवांपासून वंचित राहू नयेत यासाठी गेल्या साडेचार वर्षात विविध आजारांनी ग्रासलेल्या ५६ हजारांहून अधिक रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून साडेपाचशे कोटी रुपयांची मदत देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या मदतीमुळे रुग्णांबरोबरच त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांना दिलासा मिळाला आहे.
राज्यातील जनतेला शासकीय रुग्णालयांबरोबरच सध्या आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेखाली वैद्यकीय सेवा देण्यात येतात. या योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्यात येते. मात्र, जनआरोग्य योजनेसाठी पात्र असणाºया रुग्णांचेही अर्ज अलिकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत वैद्यकीय मदतीसाठी येत आहेत. त्यामुळे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्यासाठी वेळ लागतो. महात्मा फुले जनआरोग्य योजनेखाली पात्र असलेल्या सर्वांचा प्रीमियम शासनाकडून भरला जातो. त्यामुळे गरजू लोकांवर अन्याय होऊ नये म्हणून छाननी सुरू केली आहे.
गेल्या पाच वर्षांची तुलना त्यामागील पाच वर्षांशी केल्यास त्यात शेकडो पटीने वाढ झाल्याचे निदर्शनास येते. वर्ष २००९ ते २०१४ या दरम्यान सुमारे १६ हजार रूग्णांना ४० कोटी ५६ लाख ९४ हजार ७०० रुपये वितरित करण्यात आले होते, तर १ नोव्हेंबर २०१४ ते २० जून २०१९ या काळात ५६ हजार ३१८ रूग्णांना ५५३ कोटी ९२ लाख १९ हजार ५९८ रुपये वितरित करण्यात आले आहेत. वैद्यकीय शिबिरांमधील रुग्णांचा समावेश केल्यामुळे २०१८-१९ मध्ये १० हजार ५८२ रूग्णांना १ हजार कोटींहून अधिक सहाय्य दिले गेले आहे. कर्करोगाच्या उपचारासाठी सर्वाधिक म्हणजे ८ हजार ४६८ रूग्णांना सुमारे ९० कोटी रूपयांची मदत देण्यात आली आहे. यापूर्वी गंभीर आजारांसाठी केवळ २५ हजार रुपये वितरित करण्यात येत होते. मात्र, २०१४ पासून यामध्ये वाढ करण्यात आली असून आवश्यक त्या ठिकाणी तीन लाखापर्यंत निधी देण्यात येत आहे. दुर्धर आजाराने ग्रस्त अनेक बालकांचे प्राण या योजनेच्या माध्यमातून वाचविण्यात शासनाला यश आले आहे.
 

Web Title: Assistance of 550 crores, assistance to 56 thousand patients from the Chief Minister's Assistance Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.