सहायक पोलीस आयुक्तपदासाठी फिल्डिंग
By Admin | Published: April 27, 2016 01:40 AM2016-04-27T01:40:42+5:302016-04-27T01:40:42+5:30
पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते यांच्या निवृत्तीसाठी अवघा महिन्याचा कालावधी उरला आहे. ३१ मे रोजी ते निवृत्त होत आहेत.
पिंपरी : पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते यांच्या निवृत्तीसाठी अवघा महिन्याचा कालावधी उरला आहे. ३१ मे रोजी ते निवृत्त होत आहेत. या पदावर काम करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने काहींनी गेल्या सहा महिन्यांपासून फिल्डिंग लावली. विधाते यांचा निवृत्तीचा काळ जवळ आला असताना, रश्मी शुक्ला यांनी पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर मात्र इच्छुकांच्या हालचाली थंडावल्या आहेत.
परिमंडल ३ पोलीस उपायुक्त कार्यालय अखत्यारित पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, एमआयडीसी, वाकड, सांगवी, हिंजवडी या पोलीस ठाण्यांचा कारभार चालतो. पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक परिसर, नागरी विस्तार, तसेच आयटी, सॉफ्टवेअर कंपन्या यामुळे क्रीम एरिया मानला गेलेला हा भाग आहे. या ठिकाणी वरिष्ठ पदावर नेमणूक व्हावी, यासाठी स्पर्धा लागते. यापूर्वीचे सहायक पोलीस आयुक्त रमेश भुरेवार यांच्या निवृत्तीनंतर या पदावर येण्यासाठी अशीच स्पर्धा झाली.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील विविध पोलीस ठाण्यांत काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या विधाते यांना त्या वेळी संधी मिळाली. मे २०१५ पासून ते पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)