सहायक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!
By Admin | Published: March 18, 2017 01:08 AM2017-03-18T01:08:42+5:302017-03-18T01:08:42+5:30
सहायक पोलीस निरीक्षक धीरेंद्र बिलावल यांच्यावर बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी गुन्हा दाखल केला.
बुलडाणा, दि. १७- आरोपींचा पुन्हा पीसीआर न घेता त्यांचा जामीन मंजूर करण्यासाठी ५ लाख ५0 हजार रुपये लाचेची मागणी करणार्या मेहकर पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक धीरेंद्र बिलावल यांच्यावर बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी गुन्हा दाखल केला.
३ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दिल्या गेलेल्या तक्रारीनुसार, तक्रारकर्त्याच्या मित्रांवर मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, सदर प्रकरणात आरोपींचा पुन्हा पीसीआर न घेता त्यांचा जामीन मंजूर करून त्यांच्यावर इतर गुन्हय़ात कारवाई न करावी, यासाठी तपास अधिकारी व सहायक पोलीस निरीक्षक धीरेंद्र बिलावल यांनी ८ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी तक्रारकर्त्याने ४ लाख ५0 हजार रुपये बिलावल यांनी सांगितलेल्या बँक अकाउंटला ट्रान्स्फर केले, तर दीड लाख रुपये नगदी त्यांनी स्वीकारल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, बिलावल यांनी तक्रारकर्त्याकडे पुन्हा ५ लाख ५0 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारकर्त्याने एसीबीकडे धाव घेतली. तक्रारकर्त्याच्या तक्रारीच्या आधारे, एसीबीने तपासणी केली असता, त्यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक धीरेंद्र बिलावल यांने तक्रारदाराच्या मित्राला न्यायालयातून जामीन मिळवून देण्यात सहाय्य करण्यासाठी ५ लाख ५0 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, एसीबीने रचलेल्या सापळय़ात बिलावल याने तक्रारकर्त्यांकडून लाचेची रक्कम खासगी वकिलाकडे देण्याचे सांगितल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी एसीबीद्वारे सहायक पोलीस निरीक्षक धीरेंद्र बिलावल याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या ७, १५ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.