विद्यार्थ्यांना फ्री-शिप देण्याचे आश्वासन
By admin | Published: December 10, 2015 02:31 AM2015-12-10T02:31:44+5:302015-12-10T02:31:44+5:30
वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या आरक्षित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांना लवकरच ‘फ्री-शिप’ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फ्री-शिप, स्कॉलरशिप आणि विद्यावेतनासंदर्भात प्रलंबित असणाऱ्या मुद्द्यांवर
मुंबई: वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या आरक्षित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांना लवकरच ‘फ्री-शिप’ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फ्री-शिप, स्कॉलरशिप आणि विद्यावेतनासंदर्भात प्रलंबित असणाऱ्या मुद्द्यांवर, मार्डने वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे व समाजकल्याण विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत चर्चा केली. त्यावेळी विद्यार्थ्यांना फ्री- शिप देऊ, असे आश्वासन विनोद तावडे यांनी दिले.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आरक्षित जाती आणि जमातीतील विद्यार्थ्यांना विद्यावेतन आणि फ्री-शिप देण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे. मात्र, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांत या निर्णयाची अंमलबजावणी होत नव्हती. नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे फ्री-शिप आणि विद्यावेतन देत होते. गेल्या वर्षीपासून नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातदेखील हा नियम लागू केला आहे. मात्र, राज्यातील अन्य महाविद्यालयांत हा नियम लागू करावा, अशी मार्डची मागणी होती. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मागील तीन वर्षांच्या फ्री-शिप लागू होणार आहेत.
मध्यवर्ती मार्डचे सचिव डॉ. आयुध मकदुम यांनी सांगितले, ‘नागपूर अधिवेशनात यावर तोडगा काढण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते. त्याप्रमाणे मंत्र्यांनी राज्यातील १४ वैद्यकीय महाविद्यालयांत ‘फ्री-शिप’ देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. सरकारी निर्णयात नमूद केलेल्या फ्री-शिप, स्टायपेंड किंवा स्कॉलरशिप याबाबत राज्यातील विविध शहरातील समाजकल्याण विभागांत याबाबत फ्री-शिप किंवा स्टायपेंड अशी अंमलबजावणी होत आहे. यानंतर सर्व ठिकाणी एकसूत्रता येईल.’ (प्रतिनिधी)