एस्टीची एका दिवसाची कमाई २0 लाख
By admin | Published: October 13, 2014 10:07 PM2014-10-13T22:07:19+5:302014-10-13T23:03:45+5:30
भाजपची प्रचारसभा : तब्बल २०० बसेसशी प्रासंगिक करार, ट्रकऐवजी श्रोते आले बसमधून
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी जिल्हाभरातून नागरिकांसाठी दीडशे गाड्यांची सुविधा करण्यात आली होती. ‘प्रासंगिक करारान्वये’ जिल्हाभरातून भाजपा कार्यकर्त्यांनी गाड्यांचे आगाऊ बुकिंग केले होते. त्यामुळे एस. टी.ला २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
भाजपाचे चिपळूणचे उमेदवार माधव गवळी, राजापूरचे संजय यादवराव, दापोलीचे केदार साठे, रत्नागिरीचे बाळ माने यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा रत्नागिरीतील चंपक मैदान येथे आयोजित करण्यात आली होती. कार्यकर्त्यांना सभास्थळी आणण्यासाठी व पुन्हा गावात पोहोचवण्यासाठी एस. टी.ची सुविधा करण्यात आली होती.
कोकण रेल्वेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आले होते. त्यानंतर प्रथमच पंतप्रधान रत्नागिरीत आले असल्याने या सभेला गर्दी होणार, हे निश्चित होते. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी आगावू ग्रुप आरक्षण करून एस. टी.नेच येणे पसंद केले.
सकाळपासून भाजपा कार्यकर्ते सभेला येत होते. ग्रामीण भागातील वाडीवस्तीवरून कार्यकर्त्यांना आणण्यासाठी एस. टी.सह खासगी गाड्यांचीही सुविधा करण्यात आली होती. टेम्पो ट्रॅव्हलर, खासगी बसेस, रिक्षा टेम्पो, सुमो, महिंद्रा मॅक्स, दुचाकीव्दारे आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे खासगी वाहन चालकांनाही त्यामुळे उत्पन्न मिळाले.
पंतप्रधानांच्या सभेमुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाला देखील आर्थिक उत्पन्न प्राप्त झाले आहे. एस. टी.च्या गाड्या थेट सभामंडपापर्यंत येत होत्या. विभाग नियंत्रक के. बी. देशमुख स्वत: उपस्थित राहून गाड्यांवर लक्ष ठेवून होते.
दरम्यान एस. टी.च्या दीडशे गाड्यांचे आरक्षण करण्यात आले असले तरी काही गाड्या वाहतूक कोंडीतच अडकल्या. पंतप्रधानांची सभा झाली, त्या चंपक मैदानाकडे जाणारे रस्ते अरूंद होते. त्याचबरोबर वाहनांची दाटी आणि सुरक्षा यंत्रणा यामुळे मोठी वाहतूक कोंंडी झाली होती.
पंतप्रधानांचे आगमन होण्याच्या दोन मिनिटे अगोदर मार्गावरील वाहतूक पूणपणे थांबवण्यात आली होती. त्यामुळे झाडगाव एमआयडीसी परिसर, साळवी स्टॉप, मारूती मंदिर आदी महत्वाच्या ठिकाणी अनेक वाहने थांबून राहिली होती. काहीजण एवढ्या दूरच्या ठिकाणाहून चालत येत होते. त्यानंतर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचा सामना करत, संपूर्ण तपासणी होत असल्याने मोदींच्या सभामंडपापर्यंत जाण्यास वेळ लागत होता. या साऱ्यामुळे अनेकांना मोदींच्या भाषणापासून वंचित रहावे लागले. (प्रतिनिधी)