सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 06:41 PM2024-11-08T18:41:45+5:302024-11-08T18:42:11+5:30
अजित पवारांनी महायुतीच्या नेत्यांविरोधात प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून महायुतीत मुख्यमंत्री पदावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
अमित शहा यांनी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचे संकेत दिलेले असताना अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आम्ही भांडण होऊ नये यासाठी झुकते माप घेऊन आम्ही धर्म पाळला आहे, असे वक्तव्य केले आहे. अजित पवारांनी महायुतीच्या नेत्यांविरोधात प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून महायुतीत मुख्यमंत्री पदावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
आमच्या पक्षाने महायुतीचे धर्म पाळण्याचा काम केला आहे. महाराष्ट्रात महायुतीची सरकार यायला पाहिजे त्या हिशोबाने आमची भूमिका राहिलेली आहे. मी इथे बसून महायुतीमध्ये कोण मुख्यमंत्री होईल हे ठरवू शकत नाही. निवडणूक झाल्यानंतर तिन्ही पक्षाच्या संख्यांच्या आधारावर व संमतीने मुख्यमंत्र्यांच्या विषयी ठरणार आहे. सध्यातरी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरे जावे असे महायुतीमध्ये ठरले आहे, असे पटेल यांनी अमित शाह यांच्या वक्तव्यावर म्हटले आहे.
राजदीप सरदेसाईंच्या पुस्तकावरून बोलताना पटेल म्हणाले की, अधिकृतपणे सांगू इच्छितो की, राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातील वक्तव्य छगन भुजबळ यांचे नाही. मी सकाळीच त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले मी अजिबात असे काही बोललो नाही. या विषयावर मी कायद्याच्या द्वारे जी कारवाई करता येईल ती करणार असल्याचे त्यांनी मला सांगितले आहे.