'गांधीं'शिवाय चालतही नाही अन ते त्यांना झेपतही नाहीत - तुषार गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2022 09:43 PM2022-08-22T21:43:35+5:302022-08-22T21:43:55+5:30

स्वातंत्र्यलढ्यासाठी वेगवेगळ्या विचाराचे लोक एकत्र आले होते. पण हेतू सफल झाल्यानंतर हे सगळे लोक एकत्र राहू शकत नाहीत असे महात्मा गांधी यांना वाटत होते .

At present, the atmosphere in the country is very worrying - Tushar Gandhi | 'गांधीं'शिवाय चालतही नाही अन ते त्यांना झेपतही नाहीत - तुषार गांधी

'गांधीं'शिवाय चालतही नाही अन ते त्यांना झेपतही नाहीत - तुषार गांधी

Next

प्रमोद सुकरे

कराड - जिवंत महात्मा गांधी ज्यांना खटकायचे, त्यांना आज मारलेले गांधीही जास्त त्रास देऊ लागले आहेत. म्हणूनच त्यांची स्मृती भ्रष्ट करण्याचा कार्यक्रम विरोधक राबवीत आहेत. 'मजबूरी का नाम गांधी' असे ते म्हणतात; पण आज गांधीं शिवाय त्यांचं काही चालतही नाही आणि महात्मा गांधी त्यांना झेपतही नाहीत. असा टोला महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी विरोधकांना लगावला.

रेठरे बु: (ता. कराड) येथे सोमवारी तुषार गांधी दिवंगत ज्येष्ठ नेते यशवंतराव मोहिते यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादनासाठी आले होते. त्यावेळी ते 'लोकमत''शी बोलत होते. यावेळी डॉ. इंद्रजीत मोहिते,डॉ. सविता मोहिते, प्रा.श्रीधर साळुंखे, राजेंद्र शेलार आदींची उपस्थिती होती.

तुषार गांधी म्हणाले, सध्या देशातील वातावरण खूपच चिंतेचे आहे. पण आमच्यासारख्यांनी कधी आशा सोडलेली नाही आणि सोडणारही नाही .आम्ही आमचे विचार घेऊन वाटचाल करणारच आहोत. पंतप्रधान मोदींनी सुद्धा आमच्या गुणांची दखल घेत आम्हाला 'आंदोलनजीवी' असे म्हटले आहे. त्याचे कौतुकच वाटते असेही ते म्हणाले.

काँग्रेसला भव्य परंपरा आहे. त्याची जाणीव आज त्यांनाच करून देण्याची गरज व्यक्त करीत गांधी म्हणाले, देशात इतिहास असणारा असा एकच पक्ष आहे. कारण देशाच्या उभारणीत काँग्रेसचा मोठा वाटा आहे. त्यामुळे काँग्रेसने या इतिहासाचा अभिमान बाळगावा. तो इतिहास नव्या पिढीसमोर पुन्हा जोमाने घेऊन जावा. मग या विचाराला कोणी हरवू शकत नाही.

स्वातंत्र्यलढ्यासाठी वेगवेगळ्या विचाराचे लोक एकत्र आले होते. पण हेतू सफल झाल्यानंतर हे सगळे लोक एकत्र राहू शकत नाहीत असे महात्मा गांधी यांना वाटत होते .म्हणून त्यांनी काँग्रेस विसर्जनाचा विचार मांडला होता. हे जरी खरे असले तरी मृत्यूच्या अगोदर त्यांनीच काँग्रेसचे नवे संविधान पक्षाला सुपूर्द केले होते. यावरून काँग्रेस विसर्जित व्हावी अशी त्यांची इच्छा नव्हती हे लक्षात येते. पण आज भाजप त्यांचे विचार सोयीने मांडत असल्याचेही एका प्रश्नाला उत्तर देताना  तुषार गांधी यांनी   सांगितले.

पोलादी छातीवाले गप्प का?

ज्यांच्याकडे इतिहास नाही ते 56 इंच छातीवाले बढाया मारत फिरत आहेत. पण ज्या पोलादी छातींनी  गोळ्या झेलल्या ते काँग्रेसवाले गप्प का? हे समजत नाही. असेही तुषार गांधी यांनी यावेळी बोलताना मत व्यक्त केले.

काँग्रेसकडे अनुकरणीय नेतृत्व नाही!

महात्मा गांधी लोकांना आवाहन करण्यापूर्वी स्वतः झोकून देऊन काम करीत असत. त्यामुळे त्यांना प्रतिसाद मिळत असे. पण आज दुर्दैवाने काँग्रेसकडे अनुकरणीय नेतृत्व नाही. 'करो या मरो' नव्हे तर 'करेंगे या मरेंगे' असा महात्मा गांधींचा नारा असायचा याचा अभ्यास आजच्या काँग्रेसने करणे गरजेचे आहे .असेही तुषार गांधी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Web Title: At present, the atmosphere in the country is very worrying - Tushar Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.