अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्याला तडे; नाना पटोले पुलावर पोहोचले, सरकारला घेरले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 05:39 PM2024-06-21T17:39:15+5:302024-06-21T17:40:05+5:30
Atal Setu Cracks News: अटल सेतूच्या पुलाला जोडणाऱ्या रस्त्याला भेगा पडायला सुरुवात झाली आहे. पुलाच्या रस्त्याच्या भरावासाठी घातलेली माती खचायला लागली असून रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडू लागल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी विक्रमी वेळेत पूर्ण करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवडी ते न्हावाशेवा अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आले होते. आता याला पाच महिने होत नाही तोच पहिल्याच पावसाने रस्ते भेगाळू लागले आहेत. भेगाळल्या भुई परी अटल सेतूपर्यंत जीव मुठीत घेऊन लोकांना जावे लागणार आहे.
अटल सेतूच्या पुलाला जोडणाऱ्या रस्त्याला भेगा पडायला सुरुवात झाली आहे. भरावासाठी घातलेली माती खचायला लागली असून रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडू लागल्या आहेत. यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात असून मुंबईच्य ड्रीम प्रोजेक्ट कोस्टल रोडला लागलेल्या गळतीनंतरची ही दुसरी महत्वाकांक्षी प्रकल्पाची पोलखोल झाली आहे.
यामुळे अटल सेतूच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील या भेगाळलेल्या अटल सेतूच्या रस्त्याची पाहणी केली आहे. हा मुद्दा विधानसभा निवडणूक आणि पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना विरोधी पक्ष हातात घेण्याची शक्यता आहे.
प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीनच महिन्यांपूर्वी लोकार्पण झालेल्या "अटल सेतू" पुलास भेगा पडल्याची बाब अतिशय चिंताजनक आहे. मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिहार मध्ये नवनिर्मित पुल कोसळल्याची घटना ताजी असतानाच… pic.twitter.com/NGUrLFinj6
— Nana Patole (@NANA_PATOLE) June 21, 2024
‘अटल सेतू’ शनिवार दि. १३ जानेवारीपासून सकाळी ८ वाजेपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. सुरुवातीला छोट्या वाहनांसाठी ५०० रुपये टोल जाहीर झाला होता, तो नंतर कमी करून २५० रुपये करण्यात आला. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंतच्या टोलदरानुसार येथून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना २५० रुपयांपासून १५८० रुपये एकेरी प्रवासासाठी मोजावे लागत आहेत. या महागड्या टोलमुळे सरकारवर टीकाही झाली होती. सेतू विविध जोडरस्त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, वसई-विरार, नवी मुंबई, रायगडला जोडला गेला आहे. यामुळे मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकण्याचा त्रास कमी झाला आहे.