आठवले गटाला आता हव्यात ४० जागा
By admin | Published: January 31, 2017 02:40 AM2017-01-31T02:40:16+5:302017-01-31T02:40:16+5:30
शिवसेनेने भाजपाशी काडीमोड घेतल्याने आता भाजपाच्या मित्रपक्षाच्या अधिक जागा मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील
मुंबई : शिवसेनेने भाजपाशी काडीमोड घेतल्याने आता भाजपाच्या मित्रपक्षाच्या अधिक जागा मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआय गटाने मुंबई महापालिकेत किमान ४० ते ४५ जागांची मागणी केली आहे. त्याबाबत लवकरच भाजपाकडे प्रस्ताव देण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी सांगितले.
सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह राज्यात सर्वत्र स्वबळावर लढण्याचे जाहीर करीत युतीचा प्रश्न निकालात काढला. त्यामुळे युती तुटली तरी भाजपासोबत जाणार असल्याचे यापूर्वीच आठवले यांनी जाहीर केले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेत आरपीआयने आपल्यासाठी ४० ते ४५ जागांची मागणी केली आहे. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत युतीने २९ जागा सोडल्या होत्या. त्यापैकी केवळ एका जागेवर विजय मिळविण्यात यश आले होते. आता जागावाटपातील मोठा भागीदार नाहीसा झाल्याने भाजपाकडे आमच्या पक्षाचे प्राबल्य असलेल्या ठिकाणच्या जागा सोडण्याची मागणी केली आहे. त्याबाबत लवकरच भाजपा श्रेष्ठींकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे महातेकर यांनी सांगितले. या वेळी कार्याध्यक्ष सुमंतराव गायकवाड, तानसेन ननावरे, मुंबईचे अध्यक्ष गौतम सोनवणे उपस्थित होते. (प्रतिनिधी)