आठवले : मला एका दिवसाचा सीएम बनवाल का?
By admin | Published: April 13, 2017 02:12 AM2017-04-13T02:12:01+5:302017-04-13T02:12:01+5:30
आपल्या शीघ्रकाव्य प्रतिभेने सर्वदूर परिचित आलेले केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वत:मध्ये दडलेला पत्रकार जागा करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिलखुलास मुलाखत घेतली.
फडणवीस : तुम्ही एक दिवस अनेक दिवसांचे मुख्यमंत्री व्हाल...
आपल्या शीघ्रकाव्य प्रतिभेने सर्वदूर परिचित आलेले केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वत:मध्ये दडलेला पत्रकार जागा करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिलखुलास मुलाखत घेतली. ‘लोकमत’ने उपलब्ध करून दिलेल्या या संधीचे सोने करत, मुख्यमंत्री आणि आठवले यांच्यात रंगलेल्या सवाल-जवाबाने उपस्थितांची मने जिंकली.
‘नायक चित्रपटामध्ये अनिल कपूरने मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली आणि त्यांना एक दिवस मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. माझं काय?’ या पहिल्याच प्रश्नाद्वारे आठवले यांनी फडणवीस यांना गुगली टाकताच, उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मुख्यमंत्रीही तेवढेच हजरजबाबी असल्याने ते म्हणाले की, ‘आपण अनिल कपूरपेक्षा कमी प्रसिद्ध नाही आहात. त्यामुळे तुम्ही एक दिवसाकरिता नव्हे, तर एकदा अनेक दिवसांचे मुख्यमंत्री व्हाल!’ (प्रचंड टाळ्या)
आठवले हे पत्रकाराच्या भूमिकेत शिरले, तरी त्यांच्यातील शीघ्रकवी उसळून येत होता. आठवले यांच्या प्रश्नांची सरबती सुरू होण्यापूर्वीच ‘एवढं ‘टेन्शन’ तर बारावीच्या परीक्षेच्या वेळीही आलं नव्हतं,’ अशी कबुली फडणवीस यांनी देऊन टाकली.
‘पहली बार ले रहा हूं
मुख्यमंत्रीजी का इन्टरव्ह्यू,
लोकमत का बहुत ‘अच्छा’
दिख रहा है व्ह्यू!’
आठवलेंच्या या पहिल्याच कवितेने उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.
या वर्तमानपत्राची
साऱ्या महाराष्ट्रात आहे चांगली पत,
त्या वर्तमानपत्राचं
नाव आहे ‘लोकमत...’
ही आणखी एक कविता सादर केल्यानंतर, आठवलेंनी टाकलेला गुगली ऐकून मुख्यमंत्री अवाक झाले. अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, शरद पवार आणि मी स्वत: यांच्यातील कोणता गुण तुम्हाला भावतो, असा पुढचा प्रश्न आठवले यांनी टाकला. फडणवीस म्हणाले की, अटलजींची बुद्धिमत्ता, निरागसता आणि नि:स्पृहता वाखाणण्याजोगी आहे. नरेंद्र मोदींची निर्णयक्षमता आणि दृढता संपूर्ण विश्वाला चकित करणारी आहे. शरद पवार राजकारणातील चाणक्य आहेत. कधी कोणता मोहरा पुढे करावा, हे त्यांना चांगलं समजतं. आठवलेंची मिश्कीलपणे प्रशंसा करताना ते म्हणाले, आपली अद्भुत काव्यबुद्धी प्रशंसनीय आहे. मैत्री निभावणारा जिंदादिल माणूस म्हणून आठवले तुम्ही मला भावता, असे फडणवीस म्हणताच प्रफुल्लित झालेल्या आठवलेंनीही मग चारोळी सादर केली.
‘महाराष्ट्राचे लाडके
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
१0/१५ वर्षे तरी करणार
नाही मी त्यांना मिस,
मला आवडतो पापलेटचा पीस,
मुख्यमंत्र्यांना करतो मी विश’
आठवलेंच्या या काव्यप्रतिभेला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांपासून उपस्थितांनी अक्षरश: पोट धरून हसत दाद दिली. मुलाखतीला राजकीय रंग देण्यासाठी आठवलेंनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या ताणलेल्या राजकीय संबंधांना हात घातला. या राजकीय प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी राजकीय शैलीत टोलवले. व्यक्तिगत पातळीवर उद्धव ठाकरेंशी माझे अतिशय चांगले संबंध आहेत. निवडणुकीत कधी-कधी संबंध ताणले जातात. एकमेकांवर वाग्बाण चालतात. राजकारणात माझ्यावर झालेल्या संस्कारांनुसार मला विरोधक आहेत, पण कुणी शत्रू नाही, असे ते म्हणाले.
त्यावर पुढील विधानसभा, लोकसभा निवडणुका दोघांनी एकत्र लढा, अशी अपेक्षा आठवलेंनी व्यक्त केली.
आठवले यांच्यातील पत्रकार जागा होतो आहे, हे हेरून मुख्यमंत्र्यांनीही आठवलेंवर चारोळी सादर केली.
तुम्ही आहात श्रेष्ठ कवी,
इथे आहे सर्वांचे एकमत,
एवढे आहेत लोक
आणि साक्षीला आहे लोकमत...
मग, आठवलेंनाही मुख्यमंत्र्यांच्या प्रशंसेकरिता कविता पेश करण्याचा मोह आवरला नाही.
देवेंद्र फडणवीस आहेत
माझे चांगले मित्र,
म्हणूनच ते रंगवत
आहेत महाराष्ट्राच्या विकासाचे चित्र,
महायुती मजबूत करण्याचे
तुमचे आहे सूत्र,
कारण तुम्ही आहात
गंगाधररावांचे सुपुत्र...
मग, आठवले यांनी फडणवीस यांच्यावर कौटुंबिक प्रश्नाचा बाण सोडला. राजकारणात कधी-कधी सर्वांनाच थापा माराव्या लागतात, पण अमृता फडणवीसांना मारलेली आणि न पचलेली थाप कोणती? आता देवेंद्र यावर काय उत्तर देतात, याकडे अमृता फडणवीस यांच्यासह साऱ्यांचेच लक्ष लागले असताना, मुख्यमंत्री म्हणाले की, बायकोपुढे कोणतीही थाप पचत नसते. कुणी बायकोला थाप मारल्याचा दावा करत असेल, तर तो एकतर खोटं बोलतोय किंवा तोच सर्वात मोठा थापाड्या आहे!
मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरावरही आठवलेंनी लगेचच चारोळी तयार केली.
बायकोला मारली थाप,
की ती लगेच देते शाप,
मग आपल्याला लागते धाप,
मग आपण कधीच देत नाही थाप
मग आठवलेंनी आपला मोर्चा राजनाथ सिंह यांच्याकडे वळवला.
जिनका नाम है राजनाथ सिंग,
वो है भारत के किंग...
आठवलेंनी जय भीम, जय महाराष्ट्र करीत पत्रकाराचा मेकअप उतरवला...
आठवलेंनी महामंडळाच्या रखडलेल्या नियुक्त्यांच्या प्रश्नाला हात घातला. त्यावर फडणवीसांनी स्व. विलासराव देशमुखांचा दाखला देत, त्यांनी कुणीही मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल प्रश्न विचारला की, ते म्हणायचे, अधिवेशन झाल्यानंतर नक्की विस्तार करू. अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा विचारले की, ते पुन्हा म्हणायचे, पुढील अधिवेशनाच्या आधी नक्की करू. त्यामुळे आम्हीही अधिवेशनापूर्वी महामंडळाच्या नियुक्त्या करू, असे सांगून टाकले.