सिद्धार्थ महाविद्यालयात आठवले यांना नो एन्ट्री!
By admin | Published: April 23, 2016 03:34 AM2016-04-23T03:34:48+5:302016-04-23T03:34:48+5:30
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालयातील आनंद भुवनमध्ये खासदार रामदास आठवले यांना शुक्रवारी दुपारी पोलिसांनी प्रवेश नाकारला.
मुंबई : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालयातील आनंद भुवनमध्ये खासदार रामदास आठवले यांना शुक्रवारी दुपारी पोलिसांनी प्रवेश नाकारला. चार वर्षांपूर्वी पोलीस आयुक्तांनी घातलेली बंदी मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने उठवल्याचे सांगत आठवले यांनी वास्तूचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाच्या आदेशाची प्रत हाती आलेली नसल्याने पोलीस आयुक्तांनी आठवले यांच्या प्रवेशास मज्जाव केला.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आनंद भुवनमधील सिद्धार्थ महाविद्यालयाचा ताबा घेण्यासाठी सकाळपासून रिपाइंचे कार्यकर्ते जमले होते. दुपारी १२ वाजता कार्यकर्त्यांसह आठवले महाविद्यालयाचा ताबा घेणार होते. मात्र तत्पूर्वी पोलीस आयुक्तांनी आठवले यांच्यासोबत बैठक घेतली. न्यायालयाच्या आदेशाची प्रत हाती येईपर्यंत आठवले यांना शांतता राखण्याचे आवाहन आयुक्तांनी केले. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर येत आठवले यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
या वेळी आठवले म्हणाले की, आयुक्तांच्या विनंतीचा मान ठेवून न्यायालयाच्या आदेशाची प्रत हाती येताच दोन दिवसांत कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाचा ताबा घ्यावा. महाविद्यालयात बोगस कागदपत्रे तयार करून घुसखोरी करणाऱ्यांविरोधात चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचा दावाही त्यांनी केला. (प्रतिनिधी)