एटीएम मशीन चोरून नेणारी टोळी अटकेत, 7 गुन्हे केल्याची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 09:18 PM2018-01-10T21:18:33+5:302018-01-10T21:23:07+5:30

हॉलिवूडचा बहुचर्चित फास्ट अँड फ्युरियस -४ हा चित्रपट पाहून त्यातील कल्पना प्रत्यक्षात वापरून एटीएम मशीन चोरून त्यातील लाखो रुपये लंपास करणा-या टोळीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. 

ATM machine stolen gang, confession of 7 offenses | एटीएम मशीन चोरून नेणारी टोळी अटकेत, 7 गुन्हे केल्याची कबुली

एटीएम मशीन चोरून नेणारी टोळी अटकेत, 7 गुन्हे केल्याची कबुली

Next

पुणे : हॉलिवूडचा बहुचर्चित फास्ट अँड फ्युरियस -४ हा चित्रपट पाहून त्यातील कल्पना प्रत्यक्षात वापरून एटीएम मशीन चोरून त्यातील लाखो रुपये लंपास करणा-या टोळीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. कोंढवा पोलिसांनी कोल्हापूर येथून एक आणि कर्नाटकातून ४ अशा पाच जणांना अटक केली आहे. त्यांनी ७ एटीएम मशीन चोरून त्यातील लाखो रुपये लंपास केल्याचे उघडकीस आले आहे.

दिलीप मोरे (वय ५२, रा. सी वॉर्ड, कोल्हापूर), शिराज महम्मद बेग जमादार (वय ४१, रा. नवीन वैभवनगर, बेळगाव, कर्नाटक), मोहिद्दीन जाफर बेग जमादार (वय ५३, रा. वैभवनगर, बेळगाव, कर्नाटक), दादापीर मकदुमदार तहसीलदार (वय ३८, रा. दरबार गल्ली, बेळगाव, कर्नाटक) आणि मलिकजान कुतूबुद्दीन हनिकेरी (वय ५२, रा. वीरभद्रनगर, बेळगाव, कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

टायरच्या मार्कवरून चोरट्यांचा माग
कोंढवा येथील खडी मैदान येथील एक एटीएम मशीन ८ आॅक्टोंबर रोजी चोरुन नेली होती. त्यानंतर त्याच ठिकाणी बसविलेले दुसरे एटीएम मशीन चोरट्यांनी ३० डिसेंबर रोजी चोरुन नेले होते़ या दोन्ही एटीएम मशीनमध्ये जवळपास १९ लाख रुपये होते. याबाबत अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील आणि कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांनी माहिती दिली. चोरट्यांनी चोरी करताना मोबाईलचा वापर केला नव्हता. तसेच चेहरा झाकून त्यांनी अगोदर सीसीटीव्हीच्या वायरी कापल्यामुळे त्यातून काही माहिती मिळू शकली नव्हती. 430 डिसेंबरच्या चोरीच्या वेळी पोलिसांना गाडीच्या टायरचे ठसे हाती लागले होते. पोलिसांच्या टीमवर्कवरून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी यातील प्रमुख सूत्रधार दिलीप मोरे याला कोल्हापूरहून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याच्या इतर साथीदारांची माहिती मिळाल्यावर त्यांनाही पुण्यात आणून चौकशी केली. त्यांनी दिलेल्या माहितीची खात्री पटल्यानंतर त्यांना अटक करून त्यांच्याकडून एक स्कॉर्पिओ, एक मोटार आणि एक एटीएम मशीन जप्त केले आहे.

या आरोपीचे कोल्हापूर येथे यात्री निवास हे हॉटेल आहे. त्याच्या नूतनीकरणासाठी त्याने १८ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यात मिळालेल्या पैशातून त्याने हे कर्ज फेडले आहे. त्याच्यावर यापूर्वी चंदनचोरी आणि वाहनचोरीचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहेत.
या चोरट्यांनी स्कॉर्पिओमध्ये मॅकेनिझम करून एक यंत्रणा बसविली होती. अगोदर ते ज्या ठिकाणची एटीएम चोरायची आहे, त्या भागात दुस-या मोटारीतून जाऊन रेकी करायचे. ओसाड व सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएमला लक्ष्य करून ते संपूर्ण एटीएम मशीनच काही मिनिटांमध्ये चोरून नेत असत. अशा प्रकारे त्यांनी ७ ठिकाणचे एटीएम मशीन चोरले असल्याचे सांगतात. त्यात सोलापूर, बेगमपूर, दहीवडी, गोंदवले या ठिकाणीचा समावेश आहे, त्याची खातरजमा करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या पाचही जणांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

अशी करायचे चोरी
कोल्हापूरचा दिलीप मोरे हा या टोळीचा मास्टर मार्इंड आहे. त्यांच्यावर बेळगाव येथे वाहन चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला बेळगावला नेले असताना त्याची शिराजशी ओळख झाली. मोरे याने कोल्हापूरमधील वेगवेगळ्या ठिकाणाहून या जीपमध्ये मॅकेनिझमसाठी लागणारे वेगवेगळे पार्ट तयार करून घेतले. त्याची नंतर जुळणी केली. त्यांनी एटीएम मशीन हेरल्यानंतर रात्रीच्या वेळी ते तेथे जात जीपमधील मागची आसने काढून त्यांनी त्या ठिकाणी घडी होणारा रोलर बसविला आहे. मागचा दरवाजा उघडल्यानंतर हा रोलर ते उघडून पसरवत असत. या रोलरला एक पट्टा बसविलेला होता. तो पट्टा मशीनला लावला जात. त्यानंतर मशीन खाली पडले तर आवाज होऊ नये, यासाठी ते त्याच्या पुढे टायर टाकत असत. त्यानंतर जीपचा एक्सेलेटर वाढविल्यावर रोलरला लावलेले रोप फिरत व मशीन खेचली जात. मिनिटभरात ही मशीन उखडून टायरवर पडत असे. त्यानंतर रोलर फिरला जाऊन मशीन तशीच आत जीपमध्ये येत. रोलर फोल्ड होई. त्यापाठोपाठ ते मागचा दरवाजा बंद करून तेथून निघून जात असत. या सर्व प्रक्रियेला त्यांना साधारण अडीच मिनिटे लागत. त्यानंतर ते एटीएम मशीन फोडून त्यातील पैसे काढून घेऊन ते ओसाड जागी फेकून देत असत. त्यातील एक एटीएम किर्लोस्करवाडी येऊन जप्त करण्यात आले आहे.

Web Title: ATM machine stolen gang, confession of 7 offenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.