तुजारपूरच्या आत्माराम निकम यांचे आळंदी ते पंढरपूर लोटांगण
By Admin | Published: June 16, 2017 07:31 PM2017-06-16T19:31:12+5:302017-06-16T19:31:12+5:30
तुजारपूर (ता. वाळवा) येथील आत्माराम निकम (महाराज) यांनी पांडुरंगावरील गाढ श्रद्धेतून आळंदी ते पंढरपूर हे २८५ किलोमीटरचे अंतर चक्क लोटांगण घालत
ऑनलाइन लोकमत
इस्लामपूर (सांगली), दि. 16 - तुजारपूर (ता. वाळवा) येथील आत्माराम निकम (महाराज) यांनी पांडुरंगावरील गाढ श्रद्धेतून आळंदी ते पंढरपूर हे २८५ किलोमीटरचे अंतर चक्क लोटांगण घालत पूर्ण केले आहे. यासाठी त्यांना ४३ दिवस लागले. याबद्दल त्यांचा माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते ग्रामस्थांनी जाहीर सत्कार केला. यावेळी आ. पाटील यांनी, आत्माराम महाराज यांच्या लोटांगणाची नोंद गिनीज बुकमध्ये व्हायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
६५ वर्षीय आत्माराम महाराजांनी २३ एप्रिलला लोटांगण घालण्यास सुरूवात केली. दररोज सकाळी ते लवकर लोटांगण घालायला सुरुवात करत. कधी ८, तर कधी ९ किलोमीटर अंतर पार केल्यावर ते थांबत. त्यावेळी त्यांच्याबरोबर तुजारपूरचे नाथ महाराज, तर काही दिवस सुरुलचे नारायण पाटील होते. ते जेथे लोटांगण थांबवत, त्या गावात जेवणाची काही सोय झाली तर ठीक, नाही तर स्वत: जेवण बनवत. त्यांनी घरासह गावातील कोणालाच हे सांगितले नव्हते. त्यामुळे पहिल्या १५ दिवसात याबद्दल कोणालाच माहिती नव्हती. मात्र १५ दिवसांनंतर गावाकडे त्यांच्या कुटुंबियांना समजले. त्यानंतर दररोज तुजारपूर, उरूणवाडी या गावातील भाविक आत्माराम महाराजांच्या या उपक्रमामध्ये सहभागी होऊ लागले.
आत्माराम महाराज म्हणाले की, ग्रामदैवत भैरोबा, माझे आई, वडील व तुजारपूर, उरूणवाडी या गावातील लोकांच्या कृपाशीर्वादाने मी हे करू शकलो. आपण प्रपंचासाठी किती देह झिजवितो, मग देवासाठी थोडा देह झिजवायला नको का? भविष्यात नर्मदा परिक्रमा करणार आहे.
गजानन लाहुडकर महाराज, पुण्याचे जगदीश बोधाटे, मांडवीचे मारुती साळुंखे यांचे त्यांना सहकार्य लाभले.
राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी आत्माराम महाराजांच्या उपक्रमाचे कौतुक करून, भविष्यात आध्यात्मिक प्रसारातून तरुणांतील व्यसनाधिनता कमी होऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला. माजी सरपंच वसंतराव पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सतीश पाटील व पंडित सुतार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. ऋषिकेश पाटील याने आभार मानले. युवक कार्यकर्ता संतोष पाटील याने सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमास राजारामबापू कारखान्याचे संचालक विराज शिंदे, पं. स. सदस्य जनार्दन पाटील, प्रकाश पाटील कराड, दीपक निकम शेरे, तुजारपूरचे कृष्णात बाबर, भीमराव बाबर, संचालिका सौ. मंगल बाबर, दूध संस्थेचे अध्यक्ष संभाजी पवार, रामचंद्र पाटील, हंबीरराव बाबर, संतोष बाबर, उरूणवाडीचे तुकाराम यादव, कृष्णात सासणे, विशाल निकम, शंकर गुरुजी, भास्कर पाटील, रमेश पाटील उपस्थित होते.