वातावरण सहिष्णूच!
By Admin | Published: February 9, 2016 12:42 AM2016-02-09T00:42:16+5:302016-02-09T00:42:16+5:30
देशातले वातावरण चांगलेच असून, आपणच ते बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशा शब्दांत ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी ‘असहिष्णुते’च्या मुद्द्यावर रान उठवणाऱ्या कला
हरिप्रसाद चौरसिया : आपणच बिघडवतोय परिस्थिती
पुणे : देशातले वातावरण चांगलेच असून, आपणच ते बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशा शब्दांत ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी ‘असहिष्णुते’च्या मुद्द्यावर रान उठवणाऱ्या कला क्षेत्रातील मंडळीचा समाचार घेतला. एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
पं. चौरसिया यांना सरकारतर्फे देण्यात आलेला भूखंड वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यांच्या ‘वृंदावन गुरुकुल’साठी जुहू-वर्सोवा लिंक रोड येथे देण्यात आलेल्या जागेचा वापर ते ‘हॉलिडे होम’साठी करीत आहेत, असा त्यांच्यावर आरोप आहे. याविषयी विचारले असता इतक्या वर्षांनंतर माध्यमांचे डोळे उघडले का, असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, ‘आरोप करणाऱ्यांना गुरुकुल संकल्पना समजून घेणे गरजेचे वाटले नाही का? गुरुकुल हे गुरूचे घर असते. ही जागा निर्माण करायला आम्हाला आयुष्य खर्ची करावे लागले आहे. एका झटक्यात असे आरोप करून आमची प्रतिमा मलिन केली जात आहे.’ (प्रतिनिधी)
पुन्हा संगीत द्यायला आवडेल!
‘शिवहरी’च्या माध्यमातून पं. चौरसिया आणि पं. शिवकुमार शर्मा या जोडगोळीने ‘सिलसिला’, ‘फासले’, ‘विजय’, ‘चांदनी’ अशा चित्रपटांना संगीत दिले. ही जोडी पुन्हा अनुभवायला मिळेल का, यावर संधी मिळाल्यास पुन्हा चित्रपटांना संगीत द्यायला आवडेल, असे पं. चौरसिया यांनी सांगितले.