प्रचारसभांनंतर ‘वातावरण’ही तापले
By admin | Published: February 15, 2017 03:55 AM2017-02-15T03:55:10+5:302017-02-15T03:55:10+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मंगळवारच्या विक्रोळी येथे झालेल्या जाहीर सभेनंतर महापालिका निवडणुकीचे वातावरणही तापले
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मंगळवारच्या विक्रोळी येथे झालेल्या जाहीर सभेनंतर महापालिका निवडणुकीचे वातावरणही तापले आहे. त्यात हवामानात झालेल्या बदलामुळे मुंबईचे कमाल आणि किमान तापमान वरचढ नोंदवण्यात येत असून, बदलत्या वातावरणामुळे मुंबईकरांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. मंगळवारचे मुंबईतील कमाल तापमान ३६.७ नोंदविण्यात आले आहे. एकंदर इथल्या प्रचार सभांसह हवामानातील बदलामुळे वातावरण आणखी नरम-गरम होणार आहे.
मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३.७, २२.५ अंश नोंदवण्यात येत असून, बुधवारसह गुरुवारी कमाल तापमान ३५ अंशांच्या आसपास नोंदवण्यात येईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. जानेवारी महिना थंडीसह काहीसा उकाड्याचा गेला असतानाच फेब्रुवारीचा पहिला आठवडा काहीस गार गेला आहे. मात्र मागील तीन दिवसांपासून पुन्हा कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात येत आहे. विशेषत: सूर्याची प्रखर किरणे तापदायक ठरत असून, प्रखर सूर्यकिरणांचा मारा मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे दिवसा तापदायक ऊन पडत असतानाच रात्री किंचितसा गारवा जाणवत आहे. परिणामी दुहेरी वातावरणाचा मुंबईकरांना सामना करावा लागत आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, राज्याच्या संपूर्ण भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)