दलितांवरील अत्याचार राज्याला कलंक - आठवले
By admin | Published: May 13, 2014 04:03 AM2014-05-13T04:03:40+5:302014-05-13T04:03:40+5:30
पुरोगामी विचाराच्या राज्यात दलितांवरील अत्याचार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना राज्याचे गृहमंत्री अत्याचार कमी झाल्याचा डांगोरा पिटत दिशाभूल करत आहेत.
कोल्हापूर : पुरोगामी विचाराच्या राज्यात दलितांवरील अत्याचार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना राज्याचे गृहमंत्री अत्याचार कमी झाल्याचा डांगोरा पिटत दिशाभूल करत आहेत. दलितांवरील वाढते अत्याचार हा महाराष्टÑाला लागलेला कलंक असल्याची खंत ‘रिपाइं’ (आठवले गट)चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली. आठवले म्हणाले, राज्यात २०१३मध्ये दलितांवर १६३३ ठिकाणी अत्याचार झाले, तरीही गेल्या वर्षीपेक्षा अत्याचार कमी झाल्याचा दावा गृहमंत्री पाटील करत आहेत. अत्याचारांच्या संख्येपेक्षा ते होऊ नयेत, यासाठी राज्य शासनाने काय केले? सर्वच गावे व मराठा समाज दोषी नाही. मूठभर जातीयवादी विष पेरण्याचे काम करतात. येत्या दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांची भेट घेऊन अत्याचार वाढल्याचे पुरावे देणार असल्याचे सांगून ते म्हणाले, दलित अत्याचारविरोधी शांतता समितीची स्थापना करावी़ प्रत्येक जिल्ह्याला अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक व स्वतंत्र यंत्रणा द्यावी. जेणेकरून अशी प्रकरणे स्थानिक पातळीवरच मिटविली जातील. दलित नेत्यांच्या एकीकरणासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. (प्रतिनिधी)