‘अॅट्रॉसिटी कायदा’ रद्द होणार नाही
By admin | Published: October 12, 2016 06:44 AM2016-10-12T06:44:28+5:302016-10-12T06:44:28+5:30
राज्यात मराठा समाजाचे मूक मोर्चे मोठ्या प्रमाणात निघाले. यामुळे दलित समाजात थोडी अस्वस्थता दिसून आली. परंतु दलित समाजाला अस्वस्थ होण्याची गरज नाही. कारण
नागपूर : राज्यात मराठा समाजाचे मूक मोर्चे मोठ्या प्रमाणात निघाले. यामुळे दलित समाजात थोडी अस्वस्थता दिसून आली. परंतु दलित समाजाला अस्वस्थ होण्याची गरज नाही. कारण अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करता येत नाही आणि यासंदर्भात सरकारचा तसा कुठलाही मानस नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे ६०वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा मंगळवारी रात्री येथील दीक्षाभूमीवर पार पडला. त्याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जून सुरेई ससाई होते. प्रमुख पाहुणे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, बिहारचे राज्यपाल रामनाथ कोवींद, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री (पान ६ वर)
चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, आंध्र प्रदेशचे माजी मंत्री श्रीधर बाबू, महापौर प्रवीण दटके, कमलताई गवई, आमदार डॉ. मिलिंद माने, प्रकाश गजभिये, विभागीय आयुक्त अनुपकूमार, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात भदंत आर्य नागार्जून सुरेई ससाई यांनी उपस्थितांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देत तथागत गौतम बुद्धांच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले.
दीक्षाभूमीवर येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे दीक्षाभूमी लगतची कॉटन रिसर्च सेंटरची ३.५ एकरची जागा व माताकचेरीला लागून असलेली राज्य शासनाची नऊ एकरची जागा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मदत करण्याचे आवाहन सदानंद फुलझेले यांनी प्रास्ताविकातून केली.
यावेळी त्यांनी ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट दीक्षाभूमी डॉट ओआरजी’ हे संकेतस्थळ सुरू झाल्याची घोषणाही केली. (प्रतिनिधी)